Mumbai Corona Update : सध्या देशासह राज्यातील कोरोनाचा आकडा वाढताना दिसत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं सहर असलेल्या मुंबईतही कोरोनाचे आकडे वाढताना दिसत आहेत. जर मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर शहरात लॉकडाऊन सारखी कठोर पावलं उचलावी लागतील, असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं. तसेच मुंबईतील दैनंदिन रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचंही याच मुलाखतीत बोलताना इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं. 


मुलाखतीत बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, "सध्या शहरात 30 हजार बेड उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतही मुंबईतील लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली आहे. सध्या कठोर निर्बंध लादण्याचा कोणताही विचार नाही. जर मुंबईत एका दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले, तर कठोर निर्बंध लादण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये आधीप्रमाणे केवळ पॉझिटिव्हिटी दर नाहीतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आणि बेड्सच्या उपलब्धतेची संख्याही लक्षात घेतली जाईल. 


दरम्यान, राज्यात सध्या सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचा वाढता आकडा, यावर बोलताना महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हे भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, त्यांनी दररोज 10 हजार बेड्स भरले तरी आपण परिस्थिती हाताळू शकतो. तसेच यासंदर्भात तज्ज्ञांशीही बोलणं झालं आहे. ते म्हणतात की, मुंबईत 80 टक्के प्रकरणे ओमिक्रॉनची आहेत. येत्या काही दिवसांत ते प्रमाम 90 टक्क्यांवर पोहोचेल.


मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉनबाधित


मुंबईमधील  (Mumbai ) कोरोनाबाधितांच्या (Corona) स्पाईकमध्ये ओमायक्रॉनचाच (Omicron) हात असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत असताना डॉ. चहल यांनी याबात माहिती दिली आहे.


सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ञांनी दिल्याची माहिती डॉ. चहल यांनी या विशेष मुलाखतीत दिली आहे. असं असलं तरी सध्या तरी ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कॉरंटाईन तसंच होम कॉरंटाईन करण्यासाठी विषेश प्रोग्राम राबवल्याची माहितीही डॉ. चहल यांनी यावेळी दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा