मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही सातत्याने वाढतच आहे. देशाच्या आर्थिक राजधानीमध्येही ही रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. मुंबईत आज 10 हजार 860 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सोमवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून तो चिंतेचा विषय आहे. 


मुंबईत आजपर्यंत एकूण 7 लाख 52 हजार 012 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात सध्या 47 हजार 476 सक्रिय रुग्णसंख्या आहे. रुग्णदर दुप्पट होण्याचा कालावधी घटला असून तो 110 दिवसांवर पोहोचला आहे. 


मुंबईत कोरोना रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियमानुसार मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा महापौर किशोरी पेडणेक यांनी दिली.


 






दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. प्रशासनाकडून निर्बंधाबाबतची नियमावली जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाबाधित व्यक्ती असलेली इमारत सील करण्याबाबत मुंबई महापालिकेने सुधारीत नियमावली जाहीर केली आहे. 


एखाद्या इमारतीत किंवा विंगमध्ये राहत असलेल्या एकूण रहिवाशांपैकी 20 टक्के रहिवाशांना कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइनसाठी देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि नियमांचे सक्तीने पालन करावे लागणार आहे. हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. ते पाचव्या किंवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर करू शकतील. जर लक्षण आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर करावी लागेल असेही महापालिकेच्या नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या :