मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांच्या वर नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने चाललं आहे की काय अशी शंका उपस्थित होतेय. राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील असं आरोग्यमंत्र्यांनी जरी स्पष्ट केलं असलं तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये एक महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. 


कोविडच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी, वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. 


या बैठकीत राज्यातील मनुष्यबळ, केंद्राची मदत, राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घ्यायचा यावरदेखील चर्चा होणार आहे. उद्या होणाऱ्या या बैठकीनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल त्यासाठी अंतिम मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. 


दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 18 हजार 466 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुग्णसंख्येने अठरा हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :