Mumbai Drug Case: क्रुझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीला (NCB) मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात निर्माण होणारे अडथळे आणि अडचणींविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या एनसीबी आणि झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दाखल केलेला अर्ज सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणातील पंच फितूर झाले असून ते सध्या करत असलेली विधाने आणि आरोप यांची कोर्टाने दखल घेऊ नये यासाठी एनसीबीने कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे आता एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जांसाठी प्रलंबित आहे. त्यामुळे या घडीला आम्ही असे कोणतेही आदेश देऊ शकत नाही. तपासयंत्रणेने यासाठी योग्य त्या ठिकाणी दाद मागावी, असे हा अर्ज फेटाळताना विशेष एनडीपीएस कोर्टाचे न्यायाधीश वी.वी. पाटील यांनी आपल्या निकालात स्पष्ट केले. 


'उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये शरण येणार', किरण गोसावींची माझाला एक्स्क्लुझिव्ह माहिती


क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक एकापाठोपाठ एक सनसनाटी आरोप करत असतानाच या प्रकरणात सध्या फरार असलेला महत्वाचा साक्षीदार किरण गोसावीने शाहरुख खानकडे आर्यनला वाचवण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. त्यात 18 कोटींवर डील नक्की करण्याचे ठरले होत, ज्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना दिले जाणार होते असाही दावा करण्यात आला.  किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईलने असा खळबळजनक आरोप केला. त्याबाबत त्याने एक प्रतिज्ञापत्रही दाखल केला. एनसीबीने त्याला क्रुझ ड्रग्स प्रकरणात काही कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षरी करायला लावले होते. त्याला विरोध करत एनसीबीने विशेष न्यायालयात अर्ज दाखल करत गोसावीचा अंगरक्षक प्रभाकर साईलच्या या प्रतिज्ञापत्राची दखल घेतली जाऊ नये, असे केल्यास सदर प्रकरणातील तपासात यंत्रणेला अडथळ्यांना आणि अडचणींना सामोरे जाऊ शकते, असा दावा एनसीबीच्यावतीने या अर्जातून करण्यात आला होता.  


या सर्वप्रकराच्या पार्श्वभूमीवर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनीही एक स्वतंत्र प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. आपण निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे तपास करत असून सध्या आपल्यावर विविध कारणांनी दबाब टाकण्यात येत आहे. आपल्याला एका राजकीय व्यक्तीकडून लक्ष करण्यात येत असून त्यांच्या जावाईला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळे आपल्यावर आरोप करण्यात येत असल्याचेही वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत आपण कधीही चुकीचे वागलेलो नाही, आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून आपण कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहोत. तसेच माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत. आजही माझे काही खासगी फोटो लिक करण्यात आले. क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात प्रभावशाली आणि श्रीमंत घरातील व्यक्तींचा समावेश आहे सत्यसमोर येऊ नये, म्हणून एका तपास अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात येत असून न्यायालयाने याची दखल घ्यावी असेही वानखेडे यांनी साक्षीदारांच्या पिंजऱ्यात उभे राहत कोर्टाला सांगितले.


तपास अधिकाऱ्यांवरील आरोप हे संपूर्णतः खोटे, दिशाभूल करणारे असून एनसीबीसारख्या स्वतंत्र तपास यंत्रणेची प्रतिमा मलीन करण्यासाठी आरोप केले असल्याचे एनसीबीच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. त्यांच्या अधिकाऱ्यांवर खंडणीचे आरोप करून या प्रकरणातील तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच वानखेडेंसह एनसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांचे सेवेतील रेकॉर्ड हे स्वच्छ प्रतिमेचे असून ते प्रामाणिकपणे आणि सचोटीने मुंबई शहर ड्रग्समुक्त बनविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही एनसीबीकडून सांगण्यात आले होते.