मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातलं आणखी एक वादग्रस्त नाव म्हणजे किरण गोसावी आहे. एनसीबीचे पंच म्हणून या सगळ्या कारवाईत त्यांचा सहभाग होता. तर शाहरुखकडून खंडणी मागण्यात देखील किरण गोसावींचा सहभाग होता असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. राज्यातही अनेक गुन्हे किरण गोसावींवर दाखल आहेत. पुण्यातील एका प्रकरणात हेच किरण गोसावी आता उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये शरण येणार आहेत. एबीपी माझाशी बोलताना एक्स्क्लुझिव्ह माहिती किरण गोसावी यांनी दिली आहे. पंच प्रभाकर साईल यांच्या आरोपामुळं किरण गोसावी पुन्हा चर्चेत आले होते. 


2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला एनसीबीचे पंच म्हणून किरण गोसावी यांनी कॉर्डिलिया क्रुझवर छापा मारला होता. त्याच छाप्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडला होता. त्याच्या हाताला धरुन घेऊन येतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर किरण गोसावी एनसीबीच्या कोणत्याही पदावर नसताना, कारवाईमध्ये कसे होते? असा सवाल विचारला गेला.  तेव्हापासून किरण गोसावी बेपत्ता झाले. या कारवाईत पंच म्हणून काम केलेले मनिष भानुशाली समोर आले पण किरण गोसावी मात्र बेपत्ताच झाले. गेल्या 20 दिवसांपासून त्यांचा कोणताही थांगपत्ता नाही. पण पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांनंतर मात्र  किरण गोसावी हे या प्रकरणातले सर्वात मोठे व्हिलन ठरले आहेत.


किरण गोस्वामींवर झालेले आरोप



  • किरण गोसावींवर पुण्यातल्या फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 2018 मध्ये गोसावींनी एका तरुणाला मलेशियात नोकरी लावतो असं सांगितलं आणि त्याच्याकडून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केली.

  • किरण गोसावींवर ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. नोकरीचं आमिष दाखवून हजारो रुपये उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2015 सालच्या या प्रकरणात गोसावींना अटकही झाली होती.

  • किरण गोसावींवर मुंबईतल्या अंधेरी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डवरुन गोसावींनी 17 हजार 500 रुपयांची शॉपिंग केली या प्रकरणात कोर्टात आरोपपत्रही दाखल झालं होतं.