अर्णब गोस्वामींची सुरक्षेच्या कारणास्तव अलिबागहून तळोजा कारागृहात रवानगी
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला होणार आहे.
अलिबाग : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. कारागृह विभागाचे पोलिस महानिरीक्षकांनी याबाबत आदेश दिले असल्याची माहिती अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी दिली आहे. अर्णब गोस्वामींसह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं.
अलिबाग येथील कारागृह त्यांच्यासाठी सुरक्षित नसल्याने त्यांना तळोजा कारागृहात हलवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली होती. परंतु आपल्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन कार्यवाही करावी असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार कारागृह महानिरीक्षकांची (आय जी ) परवानगी घेऊन अर्णब यांच्यासह तिन्ही आरोपींना तळोजा कारागृहात आणलं गेल्याची माहिती अलिबाग कारागृह अधीक्षक ए . टी. पाटील यांनी दिली आहे.
अंतरिम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला होणार आहे. शनिवारी राखून ठेवलेला निकाल सोमवारी दुपारी 3 वाजता जाहीर करणार असल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाकडून याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे.
माझ्या जीवाला धोका - अर्णब दरम्यान सुप्रीम कोर्टाने मला मदत करावी, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांनी तळोजाकडे येताना केली आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे, मला बेल द्या, असंही ते म्हणाले.
गोस्वामींना तातडीनं कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी वादाच्या भोवर्यात अडकलेल्या रिपब्लिक वृत्तवाहिनेचे संपादक अर्णव गोस्वामींना तातडीनं कोणताही दिलासा देण्यास शनिवारी मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं कनिष्ठ न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने त्यात तूर्तास हस्तक्षेप करणं न्यायीक ठरणार नाही असं स्पष्ट करत आपला निकाल राखून ठेवला. हा निकाल आपण लवकरात लवकर जाहीर करू मात्र तोपर्यंत गोस्वामींसह इतर आरोपी कनिष्ठ जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतात. हा अर्ज दाखल झाल्यापासून त्यावर कनिष्ठ न्यायालयानं चार दिवसात निर्णय द्यावा असे निर्देष दिले हायकोर्टानं दिले आहेत. त्यामुळे तूर्तास पुढील आठवड्यापर्यंत अर्णब गोस्वामींचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
गोस्वामी यांच्याविरोधात केलेली कारवाई निव्वळ सुड बुध्दीने - अॅड. हरिश साळवे अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना थेट अलिबाग कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या निर्णयाला आव्हान देत ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गोस्वामींच्यावतीने हायकोर्टात अंतरीम दिलासा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. शनिवारी अर्णबच्यावतीनं कायदेतज्ञ अॅड. हरिश साळवे यांनी अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात करण्यात आलेली कारवाई ही निव्वळ सुड बुध्दीने केली गेली आहे. पोलिसांनी ही केस बंद केलेली असताना ती न्यालयाच्या आदेशाशिवाय पुन्हा उघड करणे बेकायदेशीर आहे. राजकीय वैमनस्यातून त्रास देण्याच्या हेतूने ही कारवाई झाल्याचे स्पष्ट होत असेल तर अशा अटक कारवाईत हायकोर्टाला सुटकेचा आदेश देण्याचा पूर्ण अधिकार आहे. याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. सर्व प्रतिवाद्यांच्या युक्तीवादानंतर हायकोर्टानं सध्दस्थितीत तातडीने कोणताही आदेश देता येणार नाही असं स्पष्ट करून आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.