(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Andhra Pradesh Cabinet : आंध्रच्या संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींकडून आश्वासनाची पूर्तता
जगनमोहन रेड्डींनी संपूर्ण कॅबिनेटमध्ये बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. नव्या मंत्रिमंडळात फक्त एक किंवा दोन जुन्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
Andhra Pradesh Cabinet Reshuffle : आंध्र प्रदेशमध्ये 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे फेरबदल झाले आहेत. राज्यातल्या संपूर्ण कॅबिनेटने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे बुधवारी राजीनामा सुपूर्द केला आहे. यात 24 मंत्र्यांचा समावेश आहे. जगनमोहन रेड्डींनी संपूर्ण कॅबिनेटमध्ये बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. नव्या मंत्रिमंडळात फक्त एक किंवा दोन जुन्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. 2019च्या निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर जगनमोहन रेड्डींनीच यासंदर्भातली घोषणा केली होती. जगनमोहन म्हणाले होते की, त्यांच्या अर्ध्या कार्यकाळातच नवीन टीमची नियुक्ती केली जाईल. मंत्रिमंडळातले हे फेरबदल 2021 च्या डिसेंबरमध्येच होणार होते. मात्र कोरोना संकटामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मंत्रिमंडळातल्या बदलासंदर्भातली माहिती दिली होती. 11 एप्रिलला नव्या मंत्रिमंडळाची स्थापना केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात नवीन 26 जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका मंत्र्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जाईल. प्रत्येक जात, क्षेत्र, धर्मातल्या महिला, पुरुषांना ही संधी दिली जाणार आहे. 2019 मध्ये मंत्र्यांना जबाबदारी सोपवते वेळीच अडीच वर्षासाठी त्यांना मंत्रिपद दिलं जात आहे हे सांगितल्याचं, राजीनामा दिल्यानंतर मंत्र्यांनी सांगितलं.
2019 मध्ये जगनमोहन रेड्डींनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वसमावेशक मंत्रिमंडळाची स्थापना केली होती. आता नव्या मंत्रिमंडळातही हेच समीकरण पाहायला मिळू शकतं. जुन्या मंत्रिमंडळात जगनमोहन रेड्डींनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि मुस्लिम समुदायातून पाच उपमुख्यमंत्र्यांची निवड केली होती. कॅबिनेटमध्ये तीन महिलांचाही समावेश होता.
संबंधित बातम्या :