"अंडरग्राऊंड पार्किंगमुळे दीक्षाभूमीला धोका", आंबेडकरी समाजाच्या दीक्षाभूमीतील आंदोलनावर आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया!
दीक्षाभूमी परिसरात आंबेडकरी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. आंदोलकांकडून या परिसरातील अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध केला जात आहे.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या परिसरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या परिसरात आंबेडकरी जनतेकडून आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे या भागात अंडरग्राऊंड पार्किंग उभारण्याचे काम केले जात आहे. याच पार्किंगच्या कामाला आंबेडकरी जनतेने विरोध केला आहे. आंदोलक या मागणीला घेऊन आक्रमक झाले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत. याच प्रकरणावर आंबेडकर चळवळीत काम करणारे तथा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पार्किंगमुळे दीक्षाभूमी (Dikshabhumi) वास्तूला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबवले पाहिजे, अशी भूमिका आनंदराज आंबेडकर यांनी घेतली.
आनंदराज आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
"दीक्षाभूमी परिसरात सुशोभिकरण चालू आहे, त्यात काहीही दुमत नाही. पण या परिसरात अंडरग्राऊंड पार्किंग असू नये. कारण आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमी परिसरात वर्षातून दोन ते तीन दिवस येथे येतो. या पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या वास्तूला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे काम थांबवावं असं लोकांचं मत आहे. त्याऐवजी या भागात यात्रीनिवास बांधावे. वर्षातून दोन ते तीन दिवस या भागात आंबेडकरी समाज येथे येतो, तेव्हा त्यांना या यात्रानिवासात राहण्याची सोय होईल. नागपूर अधिवेशन चालू असते तेव्हादेखील या यात्रीनिवासाचा उपयोग होईल, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.
...म्हणून जनतेचा उद्रेक झाला
पार्किंगचे हे बांधकाम दुर्दैवी आहे. त्यामुळे हे काम तातडीने बंद करावे, अशी लोकांची मागणी आहे. मी आवाहन करतो की, हे आंदोलन करताना लोकांनी संयम राखावा. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधित लोकांची बैठक घेऊन सहमतीने तोडगा काढावा, अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली. तसेच अंडरग्राऊंड पार्किंग नको असी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. पण प्रशासन ऐकायला तयार नाही. त्यामुळेच लोकांमध्ये हा उद्रेक होत आहे, असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 200 कोटींची वेगवेगळी विकास कामे सुरू आहेत . मात्र यातील अंडरग्राऊंड पार्किंग प्रकल्पाला घेऊन आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला आहे. उंडरग्राऊंड पार्किंग ही विजयादशमीच्या दिवशी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तत्काळ थांबवावे अशी आंदोलकांची मागणी आहे. इतर विकासकामांमध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडूजी व सुशोभिकरणाला आंदोलकांचा विरोध नसल्याचेदेखील आंदोलकांनी सांगितले.
हेही वाचा :