'आनंदाचा शिधा' डोक्याला ताप! काही ठिकाणी पोहोचलाच नाही, तर काही ठिकाणी महागात विक्री
Anandacha Shidha : दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात झाली आहे.
Anandacha Shidha : दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा पोहचला आहे तर काही दुकानं अजूनही या 100 रुपयांच्या किटच्या प्रतीक्षेत आहेत.. काही ठिकाणी सगळ्या वस्तू पोहोचल्या नसल्यानं तर काही ठिकाणी किटच्या पिशव्या मिळाल्या नसल्यानं वितरण रखडलंय. दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारनं केली. राज्यभरात आजची आनंदाच्या शिधा वाटपाची काय स्थिती आहे, याबाबत जाणून घेऊयात...
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सावळा गोंधळ, 100 रुपयांचा आनंदाचा शिधा 300 रुपयांना -
100 रुपयांच्या किटची ठाण्यात 300 रुपयांना विक्री केली जात आहे. एकनाथ शिंदे सरकारने गाजावाजा करीत दिवाळीत गोरगरीबांना 100 रुपयाची रेशन किट (आनंदाचा शिधा) स्वस्त धान्य दुकानात उपब्लध करून दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या जिल्हातच गोरगरीब आदिवासी रेशनधारकांकडून 300 रूपयात विक्री होत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात होत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांची फसवणूक करणाऱ्या दुकानदाराविरोधात शहापूर तहसीलदारांकडे केली तक्रार दाखल करण्यात आली आहे. तहसीलदारांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केल्याने दिवाळी किटचा काळाबाजार उघडकीस आला आहे.
राष्ट्रवादीची गांधीगिरी-
शिंदे फडणवीस सरकारने यंदाच्या दिवाळीत गोरगरिबांना भेट म्हणून 100 रुपयात धान्याचे किट्स देण्याची घोषणा केली आहे. मात्र आता दिवाळीला सुरुवात झाली, तरीही हे किट्स नागरिकांपर्यंत पोहोचलेले नसून याचा जाब विचारण्यासाठी बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. बदलापूर शहरातील शिधावाटप अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तयार फराळ भेट म्हणून दिला आणि फराळ साहित्याचे किट्स अद्याप नागरिकांना न मिळाल्याचा जाब विचारत गांधीगिरीने आंदोलन केलं. बदलापूर शहरात जवळपास 11 ते 12 हजार लाभार्थ्यांना हे दिवाळी किट्स देण्यात येणार असून त्यामध्ये रवा, साखर, पाम तेल, चणाडाळ यांचा समावेश आहे. मात्र यापैकी फक्त रवा आणि साखर हेच साहित्य आतापर्यंत आलेलं असून उर्वरित साहित्य गोदामात उपलब्ध नसल्यामुळे वितरणाला उशीर होत असल्याची माहिती शिधावाटप अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तर दुसरीकडे दिवाळी झाल्यानंतर हे साहित्य नागरिकांना देणार का? असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसने रोष व्यक्त केला.
शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिधा वाटप -
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी मतदार संघात आनंदाचा शिधा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. विखे पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निर्लज्ज पणाचा कळस गाठला असून त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. त्यांच्या सरकारच्या काळात राज्यातील जनतेला काळी दिवाळी साजरी करावी लागली याचा त्यांना विसर पडलाय. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंदाचा शिधा उपक्रम हाती घेतलाय. राज्यातील नागरिकांची दिवाळी गोड जावी यासाठी असा निर्णय करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. कार्यवाहीत थोडं पुढे-मागे झाले असेल मात्र त्यावरून टीका करणे हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनाचा कोतेपणा आहे. त्यांची सत्तेची धुंदी अजून उतरली नाही. अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची व्यवस्था शिल्लक नव्हती मात्र आता आपलं सरकार आल्याचा विश्वास लोकांनामध्ये निर्माण झाल्याचे शल्य मविआच्या नेत्यांना असल्याची टीका विखे पाटलांनी केलीये..
भंडाऱ्यात आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही -
भंडाऱ्यात रेशनकार्ड धारकांना दिवाळीपूर्वी 100 रुपयात साखर, तेल पॉकेट, रवा आणि चणाडाळ याची कीट वाटप करण्यात येणार होती. भंडारा जिल्ह्यात 2 लाख 30 हजार 289 लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक कीट रेशन दुकानात पोहचलीच नाही. 100 रुपयात कीट मिळणार असल्याने मोठ्या आशेने दिवसभर रेशन दुकानात महिला आणि पुरुषांनी चकरा मारल्या. किटच्या अपेक्षेने भंडारा शहरातील एका रेशन दुकानासमोर रात्री महिला अशा बसून होत्या. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
ग्रामपंचायतीचा आनोखा उपक्रम -
संपूर्ण राज्यभरामध्ये आनंदाची शिधा या उपक्रमाचे स्थिती काय झाली आहे हे सगळ्यांच्या समोर आहे... मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील संभापूर ही अशी ग्रामपंचायत आहे की ज्या ग्रामस्थांनी घरफाळा, पाणीपट्टी पूर्ण भरली आहे अशा कुटुंबीयांना ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळीची भेट म्हणून साखर वाटप केलीय.. ही साखर 500 रुपयांपासून 2000 रुपयापर्यंतची आहे.. ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे कर भरावा याच्यासाठी ग्रामपंचायतीने ही शक्कल लढवली आहे..
आनंदाचा शिधा मिळाला नसल्याने नवी मुंबईतील 48 हजार कुटूंबाच्या आनंदावर विरजन..
दिवाळीमध्ये गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली. मात्र आज दिवाळीची बारस असूनही अद्याप नवी मुंबईत या योजनेचा लाभ गोरगरिबांना मिळालेला नाही. शहरात 48 हजार कुटूंबांना या योजनेअंतर्गत 100 रूपयांत चार पदार्थ मिळणार आहेत. डाळ , तेल , साखर आणि शिरा यांचा समावेश आहे. रेशनिंग दुकांमध्ये आनंदाचा शिधा योजनेतील सर्व पदार्थ आले नसल्याने वाटप सुरू करण्यात आलेले नाही. लोकांच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा रेशनिंग दुकानेच बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिवाळीची बारस आली तरी आंनदाची शिधा मिळत नसल्याने आम्ही फराळ बनवायचा कधी असा प्रश्न गोरगरीब जनता विचारत आहे..
नंदुरबार:-दिवाळीत सरकारकडून मिळणाऱ्या आनंदाचा शिधा कीटचा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना प्रतीक्षा कायम.
अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून 10 रुपयात फराळ साहित्य -
एकीकडे राज्य सरकारकडून 100 रुपयात दिवाळी फराळ साहित्य दिलं जात असतानाच अंबरनाथमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून अवघ्या 10 रुपयात दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आलं. अंबरनाथमधील जवळपास साडेतीन हजार गरजू नागरिकांना हे साहित्य वाटण्यात आलं.
आणखी वाचा :
Aanandacha Shidha : आनंदाचा शिधा, विलंबाची बाधा; आनंदाचा शिधा सर्वांना कधी मिळणार?