Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडीत हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेल्यानंतर पोलिस पथकांवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. माणगाववाडीत अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पथकांसह गावठी हातभट्टी दारुअड्डयावर छापा टाकण्यासाठी गेले होते. यावेळी स्थानीक गुन्हे अन्वेषण पथकावर 10 ते 15 जणांनी पोलिसांवर हल्ला चढवला. 


हल्लेखोरांकडून काठी, दगड व चाकूचा सर्रास वापर करण्यात आला. ही घटना बुधवारी घडली. यामध्ये एका महिला पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस कर्मचारी जखमी झाले. अंकिता पाटील असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम अधिकारी शितल चंद्रकांत शिंदे यांनी हातकणंगले पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने काल हातकणंगले स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने माणगांववाडीतील अनेक अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत हातभट्टीची दारू काढण्यासाठी लागणारे रसायन, बॅरल व गूळ आदी मुद्देमाल जागीच नष्‍ट करण्यात आला. 


चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्‍ट करण्यात आला. यामध्ये लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या, पत्र्याचे डबे यामध्ये केलेल्या रसायन साठयाचा समावेश आहे. या कारवाईत संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या