Kolhapur Municipal corporation : कोल्हापूर शहरातील रस्त्यांनी किती गंभीर परिस्थिती करून ठेवली आहे याचे आणखी एक भीषण उदाहरण समोर आले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या एका अभियंत्याच्या निष्पाप आईचा आपटेनगर परिसरात रस्त्यावरी गुडघाभर खड्ड्यात पडून जागीच जीव गेला आहे. त्यामुळे कोल्हापूर मनपा प्रशासन अजून किती जणांचे रक्त सांडणार? असा सवाल उपस्थित होत आहे. 


कोल्हापूर मनपात एका विभागात कार्यरत असणाऱ्या अभियंत्याला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने अपघात होऊन जीव गेलाने चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. दिवाळीच्या तोंडावरच हसत्या खेळत्या घरातील आई अशा पद्धतीने निघून गेल्याने अभियंत्यासह कुटुंबीय सुद्धा हबकून गेले आहेत. अपघात झाल्यानंतर महापालिकेने केविलवाणा प्रयत्न करताना ज्या खड्ड्यात अंभियंत्याच्या आईचा जीव गेला तो आता मुरुम टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. 


शहरातील काही मार्गांवर पॅचवर्कचे सुरु करण्यात आले असले, तरी त्याचा अत्यंत सुमार दर्जा आहे. त्यामुळे ते केल्यानंतर काही दिवसांमध्येच उखडण्याचे प्रकार घडत आहेत. एकाबाजूला चांगल्या रस्त्यांसाठी कोल्हापूरकरांचा संघर्ष सुरु असतानाच गुजरीमध्ये केलेला रस्ता पंधरा दिवसांच्या आत खोदण्याचा पराक्रम सुद्धा महापालिकेनं केला आहे. त्यामुळे  महापालिकेत नेमकं काय चाललं आहे याचाच अंदाज लावणे कठिण  आहे.  


संपूर्ण शहर खड्ड्यात 


संपूर्ण कोल्हापूर शहरच खड्ड्यात गेल्याने परिस्थिती दिवसागणिक भयानक होत चालली आहे. शहरातील सर्वच घटकांना रस्त्यांची पार दैना झाल्याने दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या कोल्हापुरातील रिक्षा संघटनांनी एल्गार केला असून सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी महापालिकेला घेराव घालणार आहेत.  


सामाजिक कार्यकर्ते अॅड. बाबा इंदूलकर यांच्याशी एबीपी माझाने घेराओच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला होता. ते म्हणाले की, शहरात चालणाऱ्यांपासून ते वाहनाधारकांपर्यंत सर्वांनाच कोल्हापूरमधील रस्त्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे ज्यांना जीवाची काळजी आहे, त्यांनी सोमवारच्या घेरावमध्ये सहभागी व्हावे. झोपचं सोंग घेतलेल्यांना जाग करायचं आहे. या कोल्हापूर महापालिकेची कोणत्याही प्रकारची गुणवत्ता राहिलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या प्रत्येक खात्यात घोटाळा झालेला आहे. देखेंगे, दिलाएंगे, कराएंगे इतकंच सुरु आहे. 


खडी, मुरुमाच्या धुळीने डोळे बाद होण्याची वेळ 


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पाऊस थांबल्याने दिलासा मिळाला आहे. वातावरणात उष्णता जाणवत असल्याने रस्त्यांवरील ओलावा कमी होऊन पुन्हा एकदा धुळ उडण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील बऱ्याच मार्गावर पॅववर्कसाठी मुरुम आणि खडी पसरण्यात आली आहे. रस्ते वाळल्याने वाहने गेल्यानंतर वाहनांच्या धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना विचित्र परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. 


शहरातील खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघातही घडत आहेत. शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे व्यथा मांडूनही रस्त्यांमध्ये सुधारणा झालेली नाही. चांगले रस्ते कोल्हापूरकरांच्या नशिबीच नाहीत का? असाच काहीसा प्रश्न पडत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या