Aurangabad News: भारतीय जनता पक्षात आदराने घेतल्या जाणाऱ्या नावांपैकी एक असलेले माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आता आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून बागडे यांनी आतापर्यंत सहा वेळ विजय मिळवला आहे. आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विधानसभा अध्यक्षपदावर देखील काम केले आहे. मात्र आता 77 वर्षांचे झालेल्या बागडे नानांनी स्वतःच विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


गुरुवारी फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दीपावली मिलन कार्यक्रमात बोलतांना बागडे म्हणाले की,'सालडयाचे माझे दीड वर्ष शिल्लक राहिले आहेत, त्यानंतर मला सालगडी म्हणून राहयाचे नाही,' असे म्हणत बागडे यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. तर याबाबत 'एबीपी माझा'ला प्रतिक्रीया देतांना बागडे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. मात्र हे माझे मत असून, पक्षाचे मत नाही. त्यामुळे पक्षाकडून जो आदेश येईल त्याप्रमाणे मी पुढील काम करेल असे बागडे म्हणाले. 


आता कार्यकर्त्यांना वेळ देणार...


याबाबत बोलतांना हरिभाऊ बागडे म्हणाले की, आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक न लढण्याचा मी निर्णय घेतला आहे. मात्र सक्रीय राजकारणातून मी बाजूला जाणार नाही. ज्यांनी माझ्यासाठी कामे केली आहेत, त्यांच्यासाठी मला काम करायची आहे. त्यामुळे यापुढे मतदारसंघातील कार्यकर्ते, नागरिक यांच्यासाठी काम करणार असल्याचं बागडे म्हणाले. 


इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण...


गेल्या काही दिवसांपासून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधून काहीजण इच्छुक आहेत. मात्र हरिभाऊ बागडे यांच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणे कठीण होते. गेल्यावेळी देखील बागडे यांचे वय पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याबाबत अनेक चर्चा झाल्या होत्या. पण बागडे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र आता खुद्द हरिभाऊ बागडे यांनी स्वतःच विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने इच्छुकांद्म्ह्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे आता यावर पक्षाची काय भूमिका असणार आहे, हे पाहणं देखील तेवढच महत्वाचे ठरणार आहे. 


हरिभाऊ बागडेंची राजकीय कारकीर्द...



  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून बागडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

  • हरिभाऊ बागडे हे पहिल्यांदा 1985 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातून आमदार झाले.

  • त्या नंतर 1990 ,1995,2000 मध्ये सलग चार वेळा विधानसभेत निवडून गेले.

  • दरम्यान 2000 ते 2004 मध्ये राज्याचे पुरवठा व रोजगार हमी योजना मंत्री होते.

  • पुढे 2004 व 2009 मध्ये दोन वेळा पराभूत झाले.

  • पुन्हा 2014 मध्ये विजय मिळवत विधानसभेत पोहचले.

  • त्यानंतर पुढे 2019 मध्ये देखील त्यांनी पुन्हा विजय मिळवला.

  • दरम्यान 2014  ते 2019  या कालवधीत ते विधानसभेचे अध्यक्ष होते.