पालघर : वर्षभरात सर्वाधिक लांब स्थलांतर करणाऱ्या पक्षांमधील एक (22 हजार किलोमीटरहून अधिक) अशी विशेष ओळख असलेला अमूर फाल्कन हा परदेशी पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर पार करत पालघर जिल्ह्यात विश्रांतीसाठी विसावला आहे. पालघरमधील पक्षीमित्र, वन्यजीव छायाचित्रकार, पर्यावरण विज्ञानचे (Environmental science) विद्यार्थी वैभव हलदीपुर यांनी या सुंदर पक्ष्याची छबी कॅमेरामध्ये टीपली आहे. अमूर फाल्कन समूहात स्थलांतर करणारा पक्षी आहे. पालघरमध्ये हे पक्षी आपल्या सर्व कुटूंबासह गवतावर विसावले आहेत. काही दिवसातच थोडी विश्रांती घेऊन हा पक्षी पुढील प्रवासासाठी अरबी समुद्र पार करून दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने झेप घेईल.


अमूर फाल्कन हा पक्षी वर्षातून दोन ते तीन वेळा आपलं स्थान बदलत असतो. विशेष म्हणजे या पक्ष्याचा अर्धा मेंदू कायम सतर्क असतो. त्यामुळे फाल्कन सलग 48 तासांहून अधिक वेळ आकाशात उडू शकतो. भारतात अमूर, मर्लिन, शाईन आणि पेरिग्रीन असे चार प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. कीटक, बेडूक किंवा काही वेळा छोटे पक्षी हे अमूर फाल्कनचे खाद्य आहे. रशिया, आफ्रिका देशातून अमूर फाल्कन भारतात नागालँड येथे दाखल होत असून प्रवास करत हे पक्षी पालघर आले असतील, असा अंदाज पक्षीमित्र लावत आहेत.


समुद्रामार्गे किनारपट्टी भागात हजेरी


समुद्रमार्गे हे पक्षी येत असून थंडीच्या महिन्यात किनारी भागात परदेशी पक्षी येत असतात. ज्यानंतर छोटे मासे आणि चिंबोरी खाऊन हे पक्षी आपलं पोट भरतात. अमूर फाल्कन पक्ष्याप्रमाणे 40 हून अधिक स्थलांतरित पक्षी पालघर जिल्ह्यात दिसून येतात. संपूर्ण पालघर जिल्ह्यात देशी आणि विदेशी पक्षी असे मिळून एकंदर तीनशेहून अधिक पक्षांच्या नोंदी पालघरमधील पक्षी मित्रांकडे आहेत.  


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha