अमरावती : गरिबीला कंटाळून एका 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्याच्या छिदवाडी येथे दोन दिवसांपूर्वी घडली. घरची परिस्थिती हालाकीची असून माझ्या शिक्षणासाठी आई-वडिलांकडे पैसेही नाहीत, त्यांना ओझं नको म्हणून मी हे जीवन संपवत आहे असं चिठ्ठीत लिहून तिने आपलं जीवन संपवलं. तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या छीदवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी 20 तारखेला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सेजल गोपाल जाधव असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अवघ्या 17 वर्षीय मुलीच्या आत्महत्येनं गावात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सेजलनी स्वत:च्या भावना व्यक्त केल्या. वडिलांना शेतमजूरी आणि तीन एकर शेती करून घराचा उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात सतत तीन वर्षांपासून होत असलेली नापिकी. घरातील आर्थिक परिस्थिती त्यामुळे उदरनिर्वाह होत नाही, त्यातही आम्ही दोन बहिणी, एक लहान भाऊ अशा सर्वांच्या पोटाचा प्रश्न बिकट होत आहे. आमचे शिक्षण हे सर्व करत असताना आई-वडिलांना फार कष्ट करावं लागतात. त्यामुळे मी माझे जीवन संपवीत आहे असे लिहून सेजलनी आपल्या घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी कुऱ्हा पोलीसांनी घटनेची नोद घेत मर्ग दाखल केला आहे.
चिठ्ठीतील संपूर्ण मजकुर
मी सेजल गोपाल जाधव, आत्महत्या करणार आहे. माझ्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे, माझ्या घरामध्ये आम्ही सहा जण आहोत, फक्त माझी आई कामाला जाते आमच्यावर खूप कर्ज आहे. आम्हाला राहण्यासाठी जागा थोडीशी आहे. माझा भाऊ लहान आहे, माझी आई कर्ज काढून आम्हाला शिकवते. माझ्या शेतामध्ये तीन वर्षे झाली उत्पन्न खूप कमी झाले आहे, माझे बाबा खूप कष्ट करतात. आमच्यावर विश्वास आम्हाला शाळेत पाठवते मी कॉलेजमध्ये आहे. मी इयत्ता बारावी मध्ये आहे, मला शाळेत अॅडमिशन भरण्यासाठी पैसे नाही. मी खूप दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहे, माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मी स्वतःहून आत्महत्या करत आहे. माझे आई-बाबा माझ्यावर प्रेम करतात. मी पण माझ्या आई बाबा वर खूप प्रेम करते. मला शाळेमध्ये कोणत्या कोणत्या विषयाचा समज नाही. आम्हाला शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म नाही. आमचं घर लहान आहे, म्हणून मी आत्महत्या करते. माझी बहिण कामाला जाते, तिने माझ्यासाठी शाळा सोडली. ही गोष्ट माझ्या मनात खूप घर करून बसली आहे. माझी आई दररोज कामाला जाते, माझी आई खूप कष्ट करते, माझ्या आजीची मला खूप आठवण येते, लहानपणापासून त्याच्यापाशी होतो. पास-नापास होण्याच्या टेन्शन म्हणून मी जीव संपवते...
महत्वाच्या बातम्या :