बीड : एकतर जास्तीचे काम आणि त्यातही तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातील एसटी कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि त्यात पगार वेळेवर न झाल्याने बीडमधल्या तरुण ड्रायव्हरने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तुकाराम सानप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील शिरूरच्या तागडगाव येथील आहेत. एकुलत्या एक तरुण मुलाने आपलं आयुष्य संपवल्याने म्हातारपणी आजी आजोबांवर आता नातवाला सांभाळण्याची वेळ आलीय. याला कारण ठरलाय एसटीचा वेळेवर ना होणार पगार.
मागच्या दहा वर्षांपासून तुकाराम सानप एसटीमध्ये चालक म्हणून काम करत होते. पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह ते बीड शहरातील अंकुष परिसरामध्ये स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या महिन्यात पगार झाला नाही आणि त्यात लाईटचे बिलसुद्धा भरले नव्हते म्हणून या घरात मागच्या पंधरा दिवसापासून अंधार होता.
2011 साली नोकरीवर लागलेल्या तुकाराम सानप यांना सध्या 17 हजार 500 रुपये पगार होता. तुकाराम सानप यांच्यावर एसटी खात्याअंतर्गत बँकेचे पाच लाख रुपयांचे कर्ज होते. बीड शहरामध्ये घेतलेल्या एका फ्लॅटवर सहा लाख रुपयाचे गृहकर्ज होते. दोन्ही कर्जाची मिळून पंधरा हजार रुपये महिन्याला कर्जाचा हप्ता जायचा. कोरोनामुळे कित्येक महिने एसटी जागची हलली नाही. त्यानंतर सुरू असलेली एसटी आणखी म्हणावी अशी रुळावर आली नाही. हे जरी खरं असलं तरी ज्या शिलेदारांनी महाराष्ट्राची लालपरी गावागावात पोहोचवली त्यांना मात्र आता आधाराची गरज आहे.
काही दिवसांपूर्वीच संगमनेर मुक्कामी आलेल्या बसमध्येच चालकाने गळफास घेतला होता
काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली होती. 50 वर्षीय सुभाष शिवलिंग तेलोरे हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोलूबाईचे रहिवासी होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या जवळ आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले असून चिठ्ठीत कोणाचेही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही त्यांनी नमूद केलय.