सांगली : आटपाडी तालुक्यात सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचे पेव सुटलं आहे. काही जणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगले पैसे मिळाले देखील आहेत. पण काही लोकांनी शेअर मार्केटचा अभ्यास न करता, शेअर मार्केटमधून जास्त परतावा मिळण्याच्या आमिषला बळी पडले आणि आपली फसवणूक करून घेतली. यातील काही कंपन्यानी गुंतवणूकदारांना जादा टक्केवारीच्या आमिषासह अनेक प्रलोभने दाखवली. तसा आटपाडी तालुक्यात शेअर मार्कटमध्ये सुमारे साडेतीनशे कोटींहून अधिक रक्कम गुंतवली गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सखोल तपासानंतरच या शेअर मार्केट मध्ये गुंतवलेल्या रकमेचा खरा आकडा समोर येऊ शकतो. यांमधील काहीजणांना या शेअर मार्केट मधून योग्य परतावा आणि फायदा देखील मिळालाय. मात्र अनेक जणांची या मार्केटमध्ये असलेल्या काही कंपन्याकडून फसवणूक देखील होत असल्याचं समोर आलंय. 


गजानन अप्पासो गायकवाड यांनी चेन्नईच्या असलेल्या ग्रोव्हेल ट्रेड कंपनीच्या विरोधात आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलीय. दररोज 2.5 टक्क्याने पैसे मिळतील आणि 80 दिवसात दामदुप्पट मिळतील असं आमिष दाखवून Google पे आणि आरटीजीएस द्वारे  चेन्नई मधील आयडीएफसी फर्स्ट या  बँकेत ग्रोव्हेल ट्रेड कंपनीच्या बँकेच्या खात्यावर एकूण 1 कोटी 2 लाखाच्या आसपास रक्कम जमा केली गेली .यातील गजानन गायकवाड यांनी शेतीतून मिळालेलं 20 लाख रुपये गुंतवले आणि उर्वरित रक्कम मित्र आणि पाहुण्यांकडून  घेऊन गुंतवली. आता त्याची फसवणूक झाल्यासं समोर आलं आहे. 


मागील दोन वर्षांपासून आटपाडी तालुक्याला शेअर बाजाराचे वेड लागलं आहे. कष्टाने डाळिंब शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेअर बाजारातील दलालांनी जादा टक्केवारीसह चारचाकी मोटारीचे स्वप्न दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आतापर्यंत प्रगतीशील शेतकरी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यासह पोलिसांनादेखील दरमहा पाच ते दहा टक्के व्याजाचे आमिष दाखवत गुंतवणूक घेण्यात आली आहे. अनेक तर खासगी सावकार, बँक, पतसंस्था मधून कर्ज घेऊन, तर काहींनी सोनं गहाण ठेवून दहा महिन्यांत मुद्दल दुप्पट मिळत असल्याच्या आमिषाने गुंतवणूक केली आहे. तालुक्यातील गुंतवणूकदाराने आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये एक कोटीची फसवणूक झाली असल्याची तक्रार केली असून याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. बाजारामध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने आटपाडी तालुक्यातील अनेकांची फसवणूक झाली आहे. शेटफळे मधील गजानन गायकवाड यांनी गुन्हा दाखल केल्याने हे फसवणुकीची प्रकरणं पुढे आली आहेत. अशा पध्दतीने शेअर मार्केट मधील फसवणाऱ्या कंपनीकडून आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे आवाहन आटपाडी पोलिसानी केलं आहे.


शेअर मार्केट चा अभ्यास न करता आणि अति विश्वास ठेवला तर अशा पध्दतीने गुंतवलेल्या पैशाची फसवणूक होतेय हे अनेकवेळा आपण पाहतोय. योग्य पध्दतीने अभ्यास करून गुंतवणूक करून शेअर मार्केट मधून चांगला पैसा, परतावा देखील मिळतोय हे ही तितकंच खरं आहे.


महत्वाच्या बातम्या :