अमरावती : आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर रेल्वे स्टेशन बंद करा या घोषणेने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहर शनिवारी दणाणलं. दहा फुटांचे कुलूप, तीन फुटांची चावी तसेच बैलगाड्या आणि टांग्यांची मिरवणूक आणि शेकडो नागरिकांचा सहभाग. निमित्त होतं रेल रोको कृती समितीचे आंदोलन. रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी भव्य जनआंदोलन करून रेल्वे अधिकाऱ्यांना कुलूप भेट देण्यात आले. यामध्ये सर्व राजकीय पक्ष, संघटना तसेच शहरवासीय सामील झाले होते. काही व्यापारी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले होते.
मुंबईत जसं लोकल रेल्वेला महत्व आहे तेच महत्व विदर्भात पॅसेंजर रेल्वेला आहे. कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. मात्र विदर्भात अजूनही पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नाहीत. ज्या सुरू झाल्या त्या स्थानकावर थांबतच नसल्याने प्रवाशी चांगलेच संतापले आहे.
ज्या गाड्या सुरू झाल्या त्या रेल्वे गाड्यांचा पूर्ववत थांबा केवळ चांदूर रेल्वेलाच देण्यात आला नाही. सर्व गाड्यांचा स्थानिक रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अन्यथा स्टेशन बंद करण्यात यावे, यासाठी काल 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी चांदूर रेल्वे स्टेशन मास्तर यांना कुलूप भेट दिली. यासाठी तब्बल 10 फूट एका भल्यामोठ्या कुलुपाची मिरवणूक चांदूर रेल्वे शहरातून काढण्यात आली.
चांदूर रेल्वे स्थानकावर टाळेबंदीपूर्वी विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, कुर्ला एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा होता. मात्र आता या सर्व रेल्वेगाड्या सुरू होऊनही चांदूर रेल्वे स्थानकावर केवळ विदर्भ एक्सप्रेसचाच थांबा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त इतर सुरू असलेल्या गाड्यांचा थांबा देण्यात आला नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र एक्सप्रेस (01039) ही सिंधी सारख्या छोटया स्थानकावर थांबा घेते. परंतु चांदूर रेल्वे शहरात ही गाडी थांबत नाही. त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देऊन सर्व नागरिक, सर्व पक्षाचे, संघटनेचे तथा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
या अन्यायाविरूध्द सदर आंदोलन गांधी जयंतीदिनी करण्यात आले. आंदोलनात महात्मा गांधीजींच्या वेशभूषेत कमलकिशोर पनपालीया होते. येत्या पंधरा दिवसात पूर्ववत रेल्वे गाड्यांचा थांबा न मिळाल्यास यापेक्षा उग्र रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला..
पूर्वी चांदूररेल्वे येथे या रेल्वे गाड्यांचा थांबा होता, पण आता या गाड्या चांदूर स्थानकावर थांबत नाहीत.
विदर्भ एक्सप्रेस
महाराष्ट्र एक्सप्रेस
हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस
सेवाग्राम एक्सप्रेस
कुर्ला एक्सप्रेस
अमरावती - जबलपूर
अमरावती - नागपूर सुपरफास्ट
या पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
वर्धा - भुसावळ
अमरावती - नागपूर
नागपूर - भुसावळ
महत्वाच्या बातम्या :