नवी दिल्ली : भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलीच गती घेतली असून आतापर्यंत 90 कोटी लसींचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देशात 65 लाख डोस देण्यात आले असून त्यामुळे देशातील कोरोना लसीचे 90 कोटी डोस पूर्ण झाले. जगभरातील लसीकरणाची स्थिती लक्षात घेता भारताने हा एक प्रकारचा विक्रम केला असून त्याचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना जातंय असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितलं.
आतापर्यंत देशातील एकूण 65 कोटी 77 लाख 50 हजार 687 नागरिकांना कोरोना लसीचा पहीला डोस देण्यात आला आहे. तर 24 कोटी 42 लाख 59 हजार 810 नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. त्यामुळे आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 90 कोटी 42 लाख 59 हजार 810 डोस पूर्ण झाले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे. कोरोना काळात या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावलं त्यामुळे आज भारताने ही कामगिरी केली असं ते म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीकरण करणाऱ्या सर्व कंपन्यांना भेटी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला, त्यामुळे देश लसीच्या बाबतीत आत्मनिर्भर झाल्याचं दिसून येतंय असं ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय म्हणाले की, "लसीच्या बाबतीत या आधीचा इतिहास वेगळा होता. या आधी जगभरात लसीवर संशोधन व्हायचे, तिकडे निर्मिती व्हायची. त्यानंतर मग कित्येक वर्षांनी ती लस भारतात यायची. आता हे सर्व बदललं असून भारतातच लसीनिर्मिती होते. याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं."
संबंधित बातम्या :
- अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारताने कोरोना स्थिती चांगली हाताळली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- Maharashtra Corona Update : राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, राज्यात आज 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- Corona vaccination: देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता