Amravati : देशासह राज्यात सुरु असलेल्या भोंग्याचा वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं आहे. हनुमान चालीसा पठण न केल्यास मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे शिवसैनिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


याला प्रत्युत्तर देत नवनीत राणा म्हणाल्या, 'मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी मला वेळ आणि जागा सांगावी. तेव्हा तेथे येऊन मी हनुमान चालीसा पठण करेन.' अमरावतीच्या खंडेलवाल नगरमधील पगडीवाले हनुमान मंदिर याठिकाणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या तर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हनुमान चालीसा पठण करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.


दरम्यान, शुक्रवारी रात्री अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी राणा यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केलं. शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली. यासह त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर शिवसेना कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. यावर टीका करत नवनीत राणा यांनी म्हटलं की, 'आम्ही दिवसाढवळ्या येऊन दनुमान चालीसा पठ करु, त्याच्यासारखं रात्री काळोखात आंदोलन करणार नाही.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha