Mumbai Express Train : मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताचा परिणाम मुंबईतील लोकल वाहतूक सेवेवरही दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या गतीच्या मार्गावरून तूर्तास वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास माटुंगाजवळ दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे शेवटचे तीन डबे घसरले. गडग एक्स्प्रेसच्या इंजिनचे या एक्स्प्रेसला धक्का दिल्याने हा अपघात झाला. रुळावरून घसरलेल्या तीन डब्यांपैकी दोन डबे रुळावर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. 


मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,  या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात झाल्याचे समजताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. 


मध्य रेल्वेने सकाळी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे. ओव्हरहेड वायर आणि रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भायखळा ते माटुंगा दरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. तर, मुंबईबाहेरून येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन दादरपर्यंतच चालवण्यात आल्या. 






 


>> या एक्स्प्रेस ट्रेन रद्द 


दादर-माटुंगा दरम्यान झालेल्या एक्सप्रेसच्या अपघातामुळे मध्य रेल्वेने काही एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत, 


16 एप्रिल रोजी रद्द झालेल्या एक्स्प्रेस


> मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस
> पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
> मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
> मनमाड-मुंबई समर स्पेशल
> मुंबई-मनमाड समर स्पेशल
> पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
> मुंबई-पुणे डेक्कन क्वीन 






दरम्यान, या अपघाताची मध्य रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. या अपघाताचे नेमकं कारण समोर आले नाही.