Haribhau Rathod: पावसाळा (Rain) सुरु होऊन एक महिना झालं तरी राज्यात अद्याप चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. अशा स्थितीत बळीराजाकडे लक्ष देण्यास राज्यकर्त्यांना वेळ नसल्याचे मत माजी खासदार आणि बी आर एस पक्षाचे नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी व्यक्त केले आहे. राज्यात पाऊस नसल्यामुळं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, हवे तर अजून चार उपमुख्यमंत्री करा खोचक टोला राठोड यांनी सरकारला लगावला आहे. 


राज्यकर्ते फोडा-फोडी, द्वेषाचे राजकारण करण्यात व्यस्त 


जून महिना उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस अद्याप झाला नसल्यानं शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे. त्यामुळं राज्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. शासनाकडून काहीतरी उपाययोजना करण्यात येतील या आशेवर बळीराजा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता राज्यकर्ते फोडा-फोडी, द्वेषाचे राजकारण करण्यात व्यस्त असल्याचे हरिभाऊ राठोड म्हणाले. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या समस्यांकडे लक्ष देण्यास राज्यकर्त्यांना वेळ नसल्याचे राठोड म्हणाले.


 शेतकऱ्यांना सरकारनं योग्य ती मदत जाहीर करावी


राज्यामध्ये लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरकारनं योग्य ती मदत जाहीर करावी, अशी मागणी देखील राठोड यांनी केली. तसेच हवे तर आपल्या राज्याला अजून चार उपमुख्यमंत्री नेमावे असा टोलाही हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारला लगावला.


बळीराजा अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत 


राज्यातील काही भागात चांगला पाऊस होत आहे, तर काही भागात अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. पावसाळा सुरु होऊन महिना उलटला तरी अद्याप राज्यात चांगला पाऊस झाला नाही. मुंबईसह उपनगर ठाणे, कोकण या भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. महाराष्ट्रात कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पाऊस (Rain) बरसत असताना दिसत असला तरी उर्वरीत महाराष्ट्रात (Maharashtra) अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी 209.8 मिमी पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. संपूर्ण देशात सर्वात कमी पावसाची नोंद ही मराठवाड्यात झाली आहे. अशातच मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आव्हानं वाढली आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Raju Shetti : पाण्याअभावी वाळत चाललेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, राजू शेट्टींची मागणी