Raju Shetti : पाण्याअभावी वाळत चाललेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana) वतीनं करण्यात आली आहे. याबाबत स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) कोल्हापूर (kolhapur) जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांना निवेदन दिलं आहे. पावसाळा सुरु महिना झालं तरी अद्याप काही ठिकाणी पाऊस पडला नाही. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. काही ठइकाणी ऊस, सोयाबिन तसेच भाजीपाला आदी सर्व पिके होरपळून गेली आहेत. त्यामुळं वाया गेलेल्या पिकांते पंचनामे करावेत अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. 


मान्सून लांबल्याने संपूर्ण जून महिना पूर्णतः कोरडा गेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शेतीच्या पाण्यासाठी उपसा बंदी लागू केल्याने ऊस, सोयाबीन तसेच भाजीपाला आदी सर्व पिके होरपळून गेल्याचे शेट्टी म्हणाले. अनेक नद्यांनी तळ गाठलेला आहे. शेतकऱ्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. असे असताना शासनाकडून अद्यापही पिकांचे पंचनामे करण्यास सुरूवात झालेली नाही.


शेतीसाठी विद्युत पुरवठ्यामध्ये कपात 


पाऊस लांबल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले असून तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करणे आवश्यक आहे. धरणातील पाणीसाठाही मर्यादीत आहे. त्यातच विद्युत कंपनीने शेतीसाठी विद्युत पुरवठ्यामध्ये कपात केली आहे. अनेक ठिकाणी उपसा बंदी लागू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाला असल्याचे शेट्टी म्हणाले. हजारो एकर शेती वाळून गेली आहे. तरीही पंचनामे करण्यात प्रशासकीय पातळीवर चालढकल केली जाते. तसेच देवस्थान समितीवर कोणत्याही राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची नेमणूक न करता प्रशासक म्हणून  सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांचेकडेच ठेवले पाहिजेत. राजकीय दृष्ट्या सोयीसाठी दुसऱ्या व्यक्तींची नेमणूक झाली तर याला आमचा विरोध राहिल असे शेट्टी म्हणाले. 


राज्यातील काही भागात चांगला पाऊस होत आहे, तर काही भागात अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन तातडीने प्रत्येक गावातील पंचनामे करणे संदर्भात संबंधित तलाठी आणि सर्कल यांना आदेश देण्याची मागणीही शेट्टींनी केली आहे. यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, जनार्दन पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sugarcane : FRP मध्ये केलेली वाढ म्हणजे डोंगर पोखरुन हाती लागलेली उंदराची पिल्ली, राजू शेट्टींची सरकारवर खोचक टीका