मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केलेल्या वक्तव्याचा समाचार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. नारायण राणेच्या वक्तव्यावर कारवाई केली जाते पण नाना पटोलेंच्या वक्तव्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली आहे. जो न्याय राणेंना तो न्याय नाना पटोलेंना का नाही असा सवाल करत त्यांनी राज्यात 'हम करे सो कायदा' असं चित्र असल्याची टीकाही केली आहे. 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राज्यातील पोलीस हे दबावाखाली काम करत आहेत. पंतप्रधानांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अद्याप गुन्हा नोंद करुन घेण्यात आला नाही. त्यामुळे पटोलेंच्या वक्तव्यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि न्यायालयात दाद मागणार आहे."


चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, "नाना पटोले म्हणतात मोदींना मारु, नवाब मलिक म्हणतात फडणवीसांना काशीचा घाट दाखऊ. या सर्वावरुन राज्यात हम करे सो कायदा असं चित्र आहे."


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर भंडाऱ्यातील गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोलत होतो अशी सारवासारव त्यांनी केली. पण निवडणुकीच्या धर्तीवर भाजपने हा मुद्दा चांगलाच तापवला असून आज राज्यभर नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. 


काय म्हणाले होते नाना पटोले?
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले होते. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ रात्रीच्या वेळचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान नाना पटोले यांच्या भोवती लोकांचा गराडा आहे. नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. तर नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :