नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये सध्या चढाओढ दिसून येत आहे. नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्रातील भाजप आमदार कृष्णा खोपडे हे देखील आज कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा घेऊन लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी कृष्णा खोपडे यांनी नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली. मात्र, आमदार कृष्णा खोपडे हे 13 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी स्वतः ट्विट करत 13 जानेवारीला ही माहिती दिली होती. त्यानंतर अवघ्या पाचच दिवसात आज ते सुमारे शंभर कार्यकर्त्यांसह लकडगंज पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले.




आमदार कृष्णा खोपडे यांनी घरापासून लकडगंज पोलीस स्टेशनपर्यंतचा अर्धा किलोमीटरचा मार्ग कार्यकर्त्यांसह पायी चालून पूर्ण केला. आजच्या आंदोलनामध्ये कृष्णा खोपडे अनेक वेळेला विनामास्क दिसून आले. एबीपी माझाने त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याबद्दल आणि आज ते सार्वजनिकरित्या बाहेर निघाल्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी मी 13 जानेवारीला पॉझिटिव्ह आलो होतो तेव्हापासून मला कुठलीच लक्षणे नाहीत. मी याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले, त्यांनी लक्षणे नसल्यास बाहेर निघण्यास हरकत नाही असे सांगितले. म्हणून मी घराबाहेर आलो असे स्पष्टीकरण खोपडे यांनी दिले आहे.


दरम्यान, महानगरपालिकेने नागपुरात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जर कोरोना संक्रमित व्यक्तीला लक्षणं असतील तरी किमान सात दिवसाचा गृह विलगीकरण आवश्यक आहे. 7 दिवसाच्या गृह विलगीकरणाच्या अखेरचे तीन दिवस कोणतीही लक्षण नसणे आवश्यक आहे. त्यामुळे आमदार कृष्णा खोपडे यांनी आंदोलन करण्यासाठी कोरोनाच्या नियमांचा भंग केला आहे का? ते सार्वजनिक जबाबदारीचा भान विसरले आहेत का? असे प्रश्न या घटनेतून निर्माण झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: