बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोरोना काळात मास्क (Corona Mask) आणि इतर आवश्यक काळजी घेण्यामध्ये नेहमीच सतर्क असल्याचं पाहायला मिळालं. आजही ते कुठल्याही कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी अशी काळजी घेतात. सोबतच आपल्या सभोवतालच्या लोकांनाही घ्यायला लावतात.  काल कर्जत जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच (rohit pawar) मास्क वापरत नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही अन् लोक मास्क वापरत नाहीत, हे बरोबर नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 



जर तिसरी लाट आली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, त्यामुळं टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशाराही त्यांनी दिला. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील रघुनंदन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते. लसीकरण वाढवण्याकरता उपक्रम राबवा, असाही सल्ला त्यांनी दिला. लसीकरण झाल्यावर जरी कोरोना झाला तरी माणूस वाचतो. कोरोनानं काही होत नाही ही भावना काढून टाका, असंही अजित पवार म्हणाले. 



अजित पवार म्हणाले की,  केंद्र सरकारचं सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. सगळ्या छोट्या बॅंका मोठ्या बॅंकांमध्ये विलीन करुन देशात 6-7 बॅंका ठेवायच्या अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.. त्यातूनच अनेक बॅंकांचं विलीनीकरण केलं जात असल्याची टीका अजित पवार यांनी केली.



अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाराला 50 हजारांचं बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं देणं देता आलं नाही.. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम देता येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय. त्याचवेळी अशा संकट काळातही केंद्राकडून जीएसटीची रक्कम येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 


त्यांनी म्हटलं की, त्रिपुरा येथील घटनेनंतर नांदेड, मालेगाव आणि अमरावतीत जातीय दंगली उसळल्या. काही समाजकंटकांनी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.. काही गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.. मात्र आपण सर्वांनी आपली परंपरा कायम ठेवत जातीय सलोखा कायम राखावा असे आवाहन अजित पवार यांनी केलं.