अमरावती: महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 'बंद' दरम्यान हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आला असून पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबाबत माहिती दिली. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. अमरावतीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.


त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ काल झालेल्या हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र या बंदलाही हिंसक वळण लागलंय. सकाळी दहाच्या सुमारास जमाव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला. या जमावाने काही वेळातच दगडफेक आणि घोषणाबाजी सुरु केली. जमावाने यावेळी दुकानांना लक्ष्य केलं. दुकानांवर दगडफेक करत तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला.


तीन दिवस इंटरनेट सेवा बंद


शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले की, हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा तीन दिवस बंद ठेवली जाईल. अमरावतीतील राजकमल चौक परिसरात शनिवारी सकाळी शेकडो लोक बाहेर पडले आणि अनेकांनी भगवे झेंडे हातात घेतले होते.


पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की जमावात उपस्थित काही लोकांनी राजमकाल चौक आणि इतर ठिकाणी दगडफेक केली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये शहरात संचारबंदी लागू केली.


संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही.  तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नये. तसेच या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये  कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. 


अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी  म्हटलं आहे की, कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. तसेच गृहमंत्री स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


संबंधित बातम्या :


विनाकारण घराबाहेर पडू नका! संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 गुन्हा भविष्यात अडचणीचा ठरणार


Amravati violence Update : अमरावतीत बंदला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज


त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात राज्यातील आंदोलनांना हिसंक वळण, काही ठिकाणी मोर्चादरम्यान दगडफेक, शांततेचं आवाहन