पिंपरी चिंचवड : अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटलांना गृहमंत्री पद घ्या असं मी म्हणालो होतो. पण ते म्हणाले नको गृह विभागामुळं माझा बीपी वाढतो. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांकडे ते खातं गेलं. पण तुमचं तसं होऊ नये उलट तुमच्या सर्व व्याधी या गृह विभागामुळं जावोत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. अर्थात हे म्हणताना त्यांचा सूर मिश्किलपणाचा होता, म्हणूनच त्यांनी पत्रकारांना हे ऑफ दि रेकॉर्ड आहे असं सूचित केलं. नाहीतर तुम्ही ब्रेकिंग न्यूज कराल आणि जयंतराव म्हणतील अजित तू काहीही सांगत बसतो, असं म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील घोडेगावमध्ये बोलत होते.


नेमकं काय म्हणाले अजित पवार 
अजित पवार म्हणाले की, दिलीप वळसे पाटलांकडे आज गृहमंत्री पद आहे. फार बारकाईने, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. कायदा सुव्यवस्था कशी योग्य राहील. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. मागे आर आर आबा, छगन भुजबळ मग जयंत पाटील यांनी एक वर्ष गृहमंत्री पद सांभाळलं. मी यावेळी जयंतरावांना म्हटलं की तुम्ही एकच वर्ष गृहमंत्री पदी होता, आता यावेळी परत घ्या ना. पण जयंत राव म्हणाले, नाही... ते म्हणाले गृहखाते घेतल्यावर माझा बीपी वाढेल. मला गोळ्या सुरू झाल्या. मला नको गृह विभाग. लगेच पत्रकार ब्रेकिंग चालवतील, नाहीतर जयंत राव म्हणतील अजित तू काहीही माझं सांगत बसतो. दिलीपराव तसं आपलं काही होऊ नये. उलट आपल्याला ज्या काही व्याधी असतील त्या गृहखातं मिळालं म्हणून त्या सर्व व्याधी दूर व्हावं अन् तुम्ही एकदम ठणठणीत व्हा, असंही अजित पवार म्हणाले.   


अजित पवारांची मिश्किली! म्हणाले, पोरगा कारखान्याचा डायरेक्टर आहे, म्हणून मला पद्मसिंह पाटलांनी बहिण दिली 

अजित पवार म्हणाले, माझ्या माहितीनुसार अठरा महिन्यांपूर्वी खासदारांचा निधी गोठवला. आपण मात्र काल 14 ऑक्टोबरला आपण आदेश काढला. प्रति विधानसभा आमदारांसाठी चार कोटींचा निधी दिला. त्यांच्याकडे अनेक कामं येतात, यासाठी त्यांना आम्ही हा निधी देतो. मी आणि दिलीप वळसे पाटील त्या मंत्रिमंडळात नव्हतो. तेंव्हा सात मंत्री त्या बैठकीला होते. उद्धव ठाकरेंसह, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, छगन बुजबळ आणि नितीन राऊत उपस्थित होते. त्यांनी तो निर्णय घेतला. मागच्या सरकारने जो 25-15ला जो निधी दिलाय तो रद्द करायचा. मला हे माहीत ही नव्हतं. मी त्यातील काही मंत्र्यांना विचारलं तर ते म्हणाले आघाडी सरकार गेलं आणि फडणवीस सरकार आलं. तेंव्हा त्यांनी 25-15चा निधी गोठवला आणि तो त्यांच्या विचारांच्या आमदारांना दिलं. त्यांनी तसं केलं म्हणून ह्यांनी असं केलं. ही वस्तुस्थिती आहे, असं ते म्हणाले. 


माझंच बरोबर आहे, तुझं चूक आहे


कळमजाई उपसा सिंचन योजनेबाबत सांगताना अजित पवार थोडं अडखळले. त्यावेळी मंचासमोरील एकाने दादा ती कळमोडी उपसा सिंचन योजना असं म्हणत टोकलं. मग दादा थोडं थांबले. डोक्याला हात लावला आणि त्याला म्हणाले की माझंच बरोबर आहे, तुझं चूक आहे. तेंव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मग पुढे आणखी उपसा सिंचन योजनेची नावं घेतली अन जेंव्हा कळमोडी उपसा सिंचन योजनेचं नाव घेतलं तेंव्हा परत त्याच्याकडे बोट करून म्हणाले आत्ता घे कळमोडी. त्यावेळी ही हशा पिकला. तर भाषणाला उभं राहीले तेव्हा एकाने घोषणाबाजी सुरू केली. अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. आता आगे बढो, अजून कुठं आगे बढो, मला तर काय कळतच न्हाय. असं म्हणत त्याचे कान टोचले.