St Workers Strike : एसटी संपाचा आज आठवा दिवस आहे... एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 8 दिवसांपासून कामबंद आंदोलन करताहेत. मागील 8 दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांवर शासनानं निलंबनाची कारवाई केल्यानं संपकरी आणखी संतापलेत. त्यात काल परिवहनमंत्र्यांनी संप मागे घ्या, निलंबन मागे घेऊ असा शब्द दिलाय. तरी, संप अजूनही मागे घेतलेला नाही. त्यात आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परबांशी चर्चा होणार आहे. थोड्याच वेळात बैठक घेऊन आंदोलक नेते पुढची भूमिका ठरवणार आहेत.


अनिल परबांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच सदाभाऊ खोत आणि पडळकर कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करतायत असंही अनिल परबांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. दुसरीकडे  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल शरद पवारांची भेट घेतली आहे.. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. 


दुसरीकडे वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. विविध डेपोतून शिवशाही बस मार्गस्थ झाल्यात. या बसेसना पोलीस संरक्षणही देण्यात आलं. तसंच खासगी बसचालकांची मदत घेऊनही एसटी सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्र्यांनी दिलंय.  


एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून संपावर ठाम आहेत. वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. 


गेल्या सहा दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करताहेत. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत.