Akola News अकोला : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांचे होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगवर काही अज्ञातांकडून शाईफेक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. शाईफेक करणारे समोर आल्यानंतर आम्ही त्या नालायकांचे थोबाड काळं केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा आमदार मिटकरी यांनी यावेळी दिलाय.
अज्ञातांकडून बॅनरवर शाईफेक
काऱ्हाटी गावाच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. या फलकावर शाई फेक झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी पाहणी करून हा फलक तात्काळ काढला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी द्या, अशी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु असतानाच ही शाई फेकीची घटना समोर आली आहे. या बॅनरवर नेमकी कोणी शाईफेक केली यासंदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरू केला असतांनाच आता राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
थोबाड काळं केल्याशिवाय राहणार नाही
बारामती परिसरामध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या होर्डिंगवर ज्या नालायकांनी शाईफेक करण्याचा प्रयत्न केला किंवा ती फेकली असेल, त्या नालायकांना सांगू इच्छितो की, अशा प्रकारचे हलकटपणा करून तुम्हाला काही भेटणार नाही. लोकशाहीमध्ये रणांगणात उतरून लढावं लागतं. या पद्धतीचा अपमान आणि उपहास करत असाल, तर ज्या दिवशी तुम्ही दिसाल किंवा आम्हाला हे कृत्य करणारे कळतील, त्या दिवशी तुमचं थोबाड आम्ही काळ केल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले, आजची घटना अतिशय निंदनीय आहे. त्याबद्दल आम्ही सर्व त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. पण ज्यांनी ही घटना केली आहे, ते इतक्या लवकर सुटणार नाहीत. ते जिथे कुठे दिसतील त्याचं थोबाड रंगवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. असा इशारा देखील मिटकरी यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या