बारामती, पुणे : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे फलक लावण्यात आले होते. या फलकावर शाही फेकल्याची घटना समोर आली आहे. काऱ्हाटी गावाच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. या फलकावर शाई फेक झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी पाहणी करून हा फलक तात्काळ काढला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी द्या, अशी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु असतानाच ही शाई फेक घटना समोर आली आहे. या बॅनरवर नेमकी कोणी शाईफेक केली यासंदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्या!
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली आहे. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यंच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सुनेत्रा पवार याच उमेदवार असण्याची शक्यता
या अजित पवारांच्या वक्तव्यापासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली उमेदवार कोण असणार याची. अजित पवार लवकरच उमेदवार जाहीर करणार आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असण्याची जास्त शक्यता आहे. तशी चर्चा देखील रंगू लागली आहे आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांसोबत
राष्ट्रवादीतील बंडानंतर पुणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी हे अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांसोबत जाण्यामागे अनेक कारणे आहेत. दोन दशकांपासून राज्याचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला आणि ते केंद्रात रमले. त्यामुळे अजित पवारांच्या बंडानंतर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांसोबत असण्याचे पाहायला मिळतात. सहकारी कारखाने असतील किंवा पुणे जिल्हा बँक असेल यावर अजित पवारांचे वर्चस्व आहे. फक्त पुरंदरमधील काही पदाधिकारी वगळले तर संपूर्ण राष्ट्रवादी अजित पवारांसोबत राहिली आहे.
इतर महत्वाची बातमी-