Nagpur News नागपूर : राज्यात घडणाऱ्या गोळीबार आणि हत्येच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्याभरात तीन वेळा लोकप्रतिनिधींवर जीवघेणे हल्ले झाले असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या मुद्द्यावरून सध्या राज्याचे राजकारण देखील तापले असून दररोज विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे झोड उडवली जात आहे. अशातच राज्यातील गुन्हेगारीचा चढता आलेख पाहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीकास्त्र डागत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या, श्रीरामाने वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवास पत्करला होता. परंतु काही लोक सत्तेसाठी वडिलांच्या शब्दांनाच विसरतात, असा टोमणा अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
मात्र काहींना सत्तेसाठी वडिलांच्याच शब्दांचा विसर
पुढे त्या म्हणाल्या, आपली जीवनशैली कशी असावी, आपल्या मर्यादा काय असाव्यात, हे आपण राम कथेतून त्यांच्या जीवनातून आपण शिकतो. प्रभू श्री रामांनी वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवास स्वीकारला होता. पण इथे काही लोक असेही आहेत ज्यांना सत्तेसाठी वडिलांचा शब्द देखील लक्षात राहत नाही. असा अमृता फडणवीस म्हणाल्या. देवेद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना म्हणाले होते की, जर गाडी चालवतांना गाडीखाली श्वान आले तरी लोक राजीनामा मागतील. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, यांनी कुत्र्याला श्वान म्हटल्याने आपण सुसंस्कृत ठरत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व हद्दपार केली आहे. असा मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभला असल्याचीही टीका त्यांनी केली. प्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारीही राज्याच्या प्रमुखांची असते, परंतू मुख्यमंत्रीच गुंडासोबत फोटो काढत आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस सदैव तत्पर
राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सदैव तत्पर आहेत. राज्यात शांतता राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यात लक्ष देतील. असेही अमृता फडणवीस म्हणाल्या. शुक्रवारी सायंकाळी निखिल वागळे यांच्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला झाला. या प्रकाराबाबत अमृता फडणवीसांना विचारले असता त्या म्हणाल्या, निखिल वागळे यांच्यावर यापूर्वी अनेकदा हल्ले झाल्याची मला माहिती आहे. राईट टू स्पीचचा त्यांच्याकडून अनेकदा दुरुपयोग होतो. त्यामुळे त्यांनीही भान आणि मर्यादा राखून बोलायला हवे आणि लोकांनीही हिंसाचार केला नाही पाहिजे, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
इतर महत्वाच्या बातम्या