अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या दोन सभापती पदाची निवडणूक आज पार पडली. यात 'महाविकास आघाडी'ने भाजपच्या मदतीने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषदेतील सत्तेला चांगलाच हादरा दिला आहे. जिल्हा परिषदेतील आज निवडणूक झालेली दोन्ही सभापतीपदं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षांच्या आघाडीला मिळाली आहे. महिला आणि बालकल्याण सभापती पदावर बच्चू कडूंच्या 'प्रहार'च्या उमेदवार स्फूर्ती गावंडे विजयी झाल्या. त्यांनी वंचितच्या योगिता रोकडे यांचा 29 विरूद्ध 24 मतांनी पराभव केला. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत स्फुर्ती गावंडे यांनी कुटासा गटातून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर शिक्षण सभापती पदावर लाखपूरी गटातील अपक्ष सम्राट डोंगरदिवे बिनविरोध विजयी झालेत. त्यांच्या विरोधातील वंचितच्या उमेदवार संगिता अढाऊ यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याने डोंगरदिवे विजयी झालेयेत. गेल्या वेळी मतदानावेळी गैरहजर राहत आंबेडकरांना अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या भाजपने यावेळी थेट महाविकास आघाडीला मतदान केलं आहे. अकोला जिल्हा परिषदेत भाजपचे पाच सदस्य आहेत. 


वंचितचा अती आत्मविश्वास 'महाविकास आघाडी-भाजप'च्या पथ्यावर 
आज झालेल्या दोन्ही सभापती पदांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी राजकीय रणनिती आणि आकड्यांच्या खेळात वंचित बहुजन आघाडीचा सपशेल पराभव झाला. रिक्त झालेली दोन्ही सभापतीपदं आधी वंचित बहुजन आघाडीकडे होती. मात्र, यावेळी ही दोन्ही सभापतीपदं भाजपला विश्वासात घेत 'महाविकास आघाडी'नं विरोधकांकडे खेचून आणलीत. या सभापती पदांसाठी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीकडून संगिता अढाऊ आणि योगिता रोकडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर विरोधी आघाडीकडून अपक्ष सम्राट डोंगरदिवे आणि प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांना रिंगणात उतरविण्यात आलं. या विरोधी आघाडीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार आणि दोन अपक्षांचा समावेश आहे. शिक्षण सभापती पदासाठी वंचितच्या उमेदवार संगिता अढाऊ यांचा उमेदवारी अर्ज चुकल्याने तो बाद करण्यात आला. त्यामुळे अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे हे अविरोध विजयी झालेत. 


वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार संगिता अढाऊ यांच्या चुकलेल्या उमेदवारी अर्जावरून आता वंचित बहुजन आघाडीत मोठं घमासान होऊ शकतं. गेल्या वीस वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सत्तेत असलेल्या वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज चुकतो कसा? यावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामुळे प्रत्येकवेळी रणनितीत यशस्वी होणाऱ्या वंचितचा यावेळी रणनितीतील अती आत्मविश्वासामूळे पराभव झाला आहे. तर महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचितचा 29 विरूद्ध 24 मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत वंचितच्या उमेदवार योगिता रोकडे यांचा बच्चू कडू यांच्या 'प्रहार जनशक्ती पक्षा'च्या उमेदवार स्फुर्ती गावंडे यांनी पाच मतांनी पराभव केला. या सभापती पदाच्या निवडणुकीत स्फुर्ती गावंडे यांना 29 मतं मिळालीत. तर वंचितच्या योगिता रोकडे यांना 24 मतं मिळालीत. 14 जागांच्या पोटनिवडणूक निकालानंतर काँग्रेसने जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकरांसोबत जाण्याचे संकेत दिले होते. तसेच एक सदस्य असेलेल्या बच्चू कडू यांच्या 'प्रहार'चा कलही आंबेडकरांकडे जाण्याचा होता. मात्र, यावेळीही भाजप तटस्थ राहील या फाजील आत्मविश्वासानं वंचितनं ना काँग्रेसला गृहीत धरलं, ना 'प्रहार'ला. याच अती आत्मविश्वासानं वंचितचा घात करीत त्यांच्या वाट्याला पराभव आला. 


अकोला जिल्हा परिषदेतील वंचितची 'सत्ता'  अल्पमतात! 
आजच्या निकालानंतर अकोला जिल्हा परिषदेत प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी 'अल्पमता'त आल्याचं स्पष्ट झालं आहे. अकोला जिल्हा परिषदेत याआधी अध्यक्ष, उपाध्यक्षासह चारही सभापतीपदं वंचितकडे होती. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सात सदस्य मतदानावेळी अनुपस्थित राहिल्याने वंचितच्या एकहाती सत्तेचा मार्ग सुकर झाला होता. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत आठ जागा गमावणाऱ्या वंचितला सहाच जागा राखता आल्या होत्या. 53 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत दोन अपक्षांसह वंचितकडे आता 24 सदस्य आहेत. बहुमताच्या 27 या आकड्यापासून वंचित तीन आकड्यांनी दूर आहे. तर विरोधकांच्या आघाडीकडे आता 29 सदस्य झाल्याने आंबेडकरांनी जिल्हा परिषदेत बहूमत गमावल्याच्या बाबीवर आजच्या निकालांनी शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामूळे पुढच्या काळात जिल्हा परिषदेचा कारभार चालवतांना वंचित बहुजन आघाडीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. 


जुलै 2022 मधील अध्यक्ष-उपाध्यक्ष-सभापती पदांच्या निवडणुकीकडे लक्ष 
अकोला जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ जुलै 2022 मध्ये संपणार आहे. यामध्ये आज विजयी झालेल्या दोन्ही सभापतींचाही समावेश आहे. जुलै महिन्यात अध्यक्ष-उपाध्यक्षासह चारही सभापती पदांसाठी निवडणूक होणार आहे. आज झालेली आघाडी या निवडणुकीतही कायम राहिल्यास वंचित बहुजन आघाडीला अकोला जिल्हा परिषदेतील सत्ता गमवावी लागू शकते. कार्यकाळ संपण्याआधीच्या या आठ महिन्याच्या कार्यकाळात कशा घडामोडी घडतात? यावरच आंबेडकरांच्या जिल्हा परिषदेतील सत्तेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. 


अकोला जिल्ह्याच्या राजकारणात बच्चू कडूंच्या 'प्रहार'ची जोरदार 'एंट्री'  
अकोला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बच्चू कडू यांच्याकडे आहे. बच्चू कडू यांनी मंत्रीपद मिळण्याआधीपासूनच त्यांनी अकोला जिल्ह्यातील संघटन बांधणीकडे जातीने लक्ष दिलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षानं अकोट आणि मुर्तिजापूर मतदारसंघात लक्षणीय मतं घेतलीत. अकोटमध्ये पक्षाचे उमेदवार तुषार पूंडकर यांनी 24 हजारांवर मतं घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पालकमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमकपणे जिल्ह्यात पक्षवाढीकडे लक्ष दिलं आहे. अकोटमधील तत्कालीन उमेदवार तुषार पूंडकर यांच्या मृत्यूनंतर अकोट मतदारसंघातून 2019 मध्ये अपक्ष म्हणून 30 हजारांच्या आसपास मतं घेणारे अनिल गावंडे सध्या 'प्रहार'चे प्रदेशाध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकीत 'प्रहार' जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार 'एंट्री' केली आहे. 


जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या कुटासा मतदारसंघातून 'प्रहार'च्या स्फूर्ती गावंडे विजयी झाल्यात. विशेष म्हणजे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा गृह मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून 'प्रहार'च्या उमेदवार स्फूर्ती गावंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करीत विजय मिळविला. यासोबतच या पोटनिवडणुकीत अकोट तालुक्यातल्या मूंडगाव पंचायत समिती मतदारसंघातून 'प्रहार'चे ज्ञानेश्वर दहीभात विजयी झाले होते. आजच्या सभापती पदाच्या निवडणुकीत 'प्रहार'च्या स्फूर्ती गावंडेंनी थेट जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी विजयी होत जिल्ह्यातील राजकारणात 'प्रहार'ची दखल घ्यायला राजकीय पंडितांना भाग पाडले आहे. 


आजच्या अकोला जिल्हा परिषदेच्या दोन सभापती पदाची निवडणूक ही जिल्हा परिषदेतील पुढील राजकारणाची 'लिटमस टेस्ट' आहे. ही 'टेस्ट' प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी धोक्याची 'घंटा' आहे. तर हे घडवून आणणाऱ्या भाजप आणि 'महाविकास आघाडी' शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेकडे घेवून जाणारा आशेचा किरण आहे. या राजकारणात जिल्ह्याचा रखडलेला विकास खरंच गतीमान होईल का? याचं उत्तरही येणारा काळच देईल. 


अकोला जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल :


एकूण जागा : 53
वंचित बहूजन आघाडी : 23
शिवसेना : 13
भाजप : 05
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 04
प्रहार : 01
अपक्ष : 03


अलिकडे झालेल्या पोटनिवडणुकीत कोणत्या पक्षानं जिल्हा परिषदेच्या किती जागा जिंकल्या?


निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01


महत्वाच्या बातम्या :