Akola News अकोलाअकोला शहरामध्ये (Akola News) आज एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) थेट सभेवर प्रश्न उपस्थित दोन्ही नेत्यांना समज दिली आहे. देशभर उद्या शिवजयंती साजरी होत असतानाच दोन नेत्यांच्या अकोल्यात सभा का होत आहे? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


भाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी समाजात वाद निर्माण होईल, अशी प्रक्षोभक वक्तव्य टाळावीत. अकोला शहरात हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहत आलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यात वाद होईल अशी वक्तव्य त्यांनी करू नये, अशी कळकळीची विनंती आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. सोबतच पोलिसांना देखील आवाहन करीत म्हटले आहे की, या दोन्ही नेत्यांना समज देऊन जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्था कुठे अडचण निर्माण येईल, असा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याचे देखील आवाहन मिटकरींनी केले आहे. 


अकोल्यात एकाच वेळी दोन सभा


भाजप आमदार नितेश राणे यांची आज अकोला जिल्ह्यातील निंबा फाटालगतच्या लोहारा गावातील मशिदीच्या अतिक्रमणामुळे निंबा फाटा येथे जाहीर सभा घेणार आहे. तसेच ते लोहारा गावाला देखील भेट देतील, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे  खासदार असदुद्दीन ओवेसींची जाहीर सभा आज अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फीकारबाबा मैदानावर संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम अकोल्यात उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र त्यापूर्वीच अकोला शहरातील सामाजिक वातावरण बिघडू नये, असा सावध पवित्रा आमदार अमोल मिटकरी यांनी घेत या दोन्ही नेत्यांना समज दिली आहे. 


या विषयावर भाष्य करताना अमोल मिटकरी म्हणाले की,  अकोला जिल्हा हा धार्मिक सलोखा जपणारा जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे की इथे हिंदू मुस्लिम एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. जे काही बेकायदेशीर असेल त्या ठिकाणी त्यांनी नक्कीच भाष्य करावं, त्याबद्दल कुणाचेही दुमत नाही. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ज्याने त्याने तो बाजवला देखील पाहिजे. मात्र अकोला शहराचा इतिहास पाहता जिल्ह्यामधली कायदा आणि सुव्यवस्था कुठे अडचणीत येईल असा प्रयत्न कोणी करू नये. मी ज्या पक्षात आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे. मात्र ओवेसी असतील किंवा नितेश राणे असतील यांनी हिंदू आणि मुस्लिम मध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करू नये. या दोन्ही नेत्यांना भाषण दरम्यान प्रक्षोभक वक्तव्य करू नये ही त्यांना विनंती असल्याचे देखील आमदार अमोल मिटकरी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या