Nashik Yeola News नाशिक : जानेवारीत पालखेड डावा कालव्याला काही ठराविक चारीला पाणी दिले नाही म्हणून त्यांचे गेट तोडून पाणी सोडणाऱ्या भाजपच्या नेत्या अमृता वसंत पवार (Amruta Pawar) यांच्यावर नाशिकच्या येवला तालुका पोलिसांनी (Yeola Police) गुन्हा दाखल केला आहे.


यावेळी पोलीस स्थानकात अमृता पवार या नोटीस घेण्यासाठी आले असताना यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे बघण्यास मिळाले. शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही ते मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल त्यामुळे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते अमृता पवार यांनी दिली आहे.


पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन


अवर्षणप्रवण तालुका असल्याने पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर तालुक्यातील रब्बी हंगाम अवलंबून असतो. यंदा पाऊस कमी झाल्याने या आवर्तनाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी रब्बीची पिके व कांदा लागवड केली आहे. त्यातच नोंदणी करूनही पाणी मिळत नसल्याने विविध भागांतील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. 


अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातोय


पालखेड कालव्यावरील चारी क्रमांक 25 आणि 28 येथे शेतकऱ्यांवर पाणी देण्यात अन्याय होत असल्याने या चारी भाजपच्या अमृता पवार व समर्थकांनी फोडल्या आणि शेतकऱ्यांना पाणी मिळवून दिले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे पवार समर्थकांनी म्हटले आहे. 


आपली चूक नाही


दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने पालखेड कालव्याला सोडलेल्या आवर्तनात मुखेड परिसरातील अनेक शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याचा आरोप करत पवार यांनी महिनाभरापूर्वी आंदोलनाची भूमिका घेत पाणी सोडले होते. पोलिसांनी शनिवारी पवार यांना यासंदर्भात नोटीस बजावली. पवार येथील भाजप नेते व समर्थकांसह तालुका पोलीस ठाण्यात आल्या होत्या. यावेळी नोटीस स्वीकारत त्यांनी आपण कोणतीही चूक केली नसल्याचे माध्यमासमोर सांगितले. 


माझ्यासह दोन शेतकरी महिलांना गुन्ह्यात अडकवले


पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी हक्काचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले. रीतसर मागणी नोंदवली आहे. तरीही पाणी मिळत नाही. पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या पिकांचा करपा होताना त्यांना पाहवत नसल्याने त्या परिसरातील शेतकरी पुरुष, महिलांनी विनंती केली. त्यांना पाणी मिळावे म्हणून आपण प्रयत्न केले. याचा राग संबंधितांना तब्बल महिना उलटून गेल्यानंतर आला. आज त्यांनी माझ्यासह दोन शेतकरी महिलांनाही या गुन्ह्यात अडकवले आहे, असे यावेळी पवार म्हणाल्या. 


आणखी वाचा 


Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त नाशिकच्या वाहतुकीत मोठे बदल, कुठले रस्ते बंद, कुठले सुरु? जाणून घ्या