Akola News : अकोल्यात एका 20 वर्षीय युवकाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हर्ष संजय बोचरे असं खदानीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना काल (21 एप्रिल) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. 


दरम्यान, हर्ष हा त्याच्या मित्रांबरोबर शिवणी रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या कोठारी खदान परिसरात फिरायला गेला होता. मात्र, त्याचा तोल गेल्याने पाण्याने भरलेले खदानीत तो बुडाला अन् त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातील प्रख्यात वकील संजय बोचरे यांचा हर्ष हा मुलगा आहे. त्यांच्या दोन मित्रांबरोबर काल सायंकाळी अकोला शहरातील शिवणी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या कोठारी खदान परिसरात फिरायला गेले. यादरम्यान हर्ष पायी चालत असताना, त्याचा तोल गेला अन् तो पाण्याने भरलेल्या खदानीत बुडाला. यामध्ये हर्षचा  दुर्दैवी मृत्यू झाला. यासंदर्भात खदान पोलिसांना माहिती देतात त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर संत गाडगेबाबा आपत्कालीन व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनाही हर्षचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी बोलवण्यात आले. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर हर्षचा मृतदेह हाती लागला. 
 
आज सकाळी अकोला शहरातील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. सद्यस्थितीत पोलिसांनी या घटनेसंदर्भात आकस्मित मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास सुरु आहे. तरी हर्षच्या मृत्यू मागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. याचा तपास पोलीस करणार आहेत. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष याचा तोल गेल्याने खदानीत बुडाला आणि यात त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच बोचरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपला मुलगा आता या जगात नाही यावर त्यांचा विश्वास बसतच नव्हता. यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.


बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजरच्या मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना रात्री साडे आठच्या सुमारास माहिती देताच त्यांनी लागेच घटनास्थळ गाठले. त्यांनी तत्काळ त्यांचे सहकारी मयुर सळेदार, ऋषीकेश राखोंडे, आकाश बगाडे, गोकुळ तायडे यांनी 'रेस्क्यु बोट'द्वारे सर्च ऑपरेशन सुरु केलं. खदानीत कुठं 15  फुट तर कुठ 25 ते 30 फुट खोल पाणी आणि कपारी होत्या. यातही अंधार असल्याने सर्च ऑपरेशनमध्ये अनेक अडथळे निर्माण होत होते. अखेर रात्री उशिरा 3 वाजता युवकाचा मृतदेह रेस्क्यु टीम'च्या हाती लागला. यावेळी खदान  पोलीस स्टेशनचे एपीआय योगेश वाघमारे आणि पोलीस कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, अग्निशमन अधिकारी व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 


महत्त्वाच्या बातम्या: