नांदेड : हळद शिजवताना कुकरचा स्फोट होऊन एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत इथे काल (21 एप्रिल) ही दुर्दैवी घटना घडली. हळद शिजवताना कूकरमधून पाण्याची गळती होत असल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. सुनील मारवाड असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. 


कच्ची हळद शिजवत असताना हळदीच्या कुकरमधून पाणी का गळतंय हे पाहण्यासाठी शेतकरी कुकरजवळ गेला. मात्र त्याच वेळी कूकरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता की, कूकरचे अक्षरशः तुकडे तुकडे होऊन दूरवर अंतरावर जाऊन पडले. यात सुनील मारवाड या 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुनीलची पत्नी, मुलगा आणि अन्य एक मजूर असे तीन जण गंभीर जखमी आहेत. या जखमींवर उदगीरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


सध्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला सोन्याचा भाव आलाय, ज्यात हळद दहा हजार रुपये अशा विक्रमी दराने विक्री होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात मात्र आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागात हळद काढणीस मोठा वेग आलाय. ज्यात हळद काढणी, शिजवणे, वाळवणे, ढोल करणे या कामांना गती आल्याचे पाहावयास मिळत आहे. हळद काढणीच्या या हंगामात शेतकरी आपल्या पूर्ण परिवारासह शेतातच ठाण मांडून या हळदीला सोनेरी झळाळी देण्यासाठी अहोरात्र राबतानाचे चित्र आहे. तर दुसरीकडे उन्हाचाही पारा वाढून 42 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे आतिउष्णतेमुळे विद्युत वाहक रोहित्राचा स्फोट होणे आणि हळद कुकरचा स्फोट होण्याच्या घटना होताना दिसत आहे.


कच्ची हळद शिजवणं सुरु असल्याने सुनील मारवाड यांची पत्नी आणि मुलगा हे सर्व कुटुंब शेतातच वास्तव्यास होते. जे हळद शिजवणे, काढणे या कामात त्यांना मदत करत होते. परंतु कुकरचा स्फोट झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी, मुलगा आणि मजूर जखमी झाले. वयाची तिशीही न गाठलेल्या या शेतकऱ्याच्या मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.