Akola Crime News : दारुड्या पतीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केले. पुढे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील शेकापूर गावात गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोपीचंद राजाराम चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे. तो अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील शेकापूरचा रहिवाशी आहे. तर संगिता गोपीचंद चव्हाण (28) असं मृत पत्नीचं नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मृतक महिलेने अनेकदा पातूर पोलिसांत पतीविरुद्ध तक्रारी दिल्या. मात्र वेळीच ठोस पाऊले न उचलली गेल्याने आज दोन मुलांनी आईचं छत्र गमावलं आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
आरोपी गोपीचंद आणि संगिताचा विवाह मागील आठ वर्षांपूर्वी झाला. काही दिवस संसार सुरळीतपणे सुरू असतांना गोपीचंदला दारूचे व्यसन लागलं. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी किरकोळ कारणांवरून वाद होत असत. नेहमी नेहमी दारू पिऊन गोपीचंद हा संगिताला मारहाण करीत तिच्यावर संशय घ्यायचा. याप्रकरणी संगिताने पातूर पोलीसांत पतीविरुद्ध दोनवेळा तक्रारीसुद्धा दिल्या होत्या. परंतु, पातूर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. अखेर संगिता माहेर गेली. ती आपल्या अर्जुन आणि अंशुमन या दोन मुलांसह माहेरी राहत होती. काही कालावधीनंतर संगिता गोपीचंदसोबत नांदायला गेली. त्यानंतरही त्यांच्यात वाद व्हायचे.
दरम्यान, 12 ऑक्टोबरच्या रात्री पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रात्री झोपी गेल्यावर गोपीचंद आज गुरुवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास झोपेतून उठला. अन् कुऱ्हाडीने संगिताच्या डोक्यात, मानेवर आणि पायावर वार केले. या हल्ल्यात संगिता गंभीर जखमी झाली आणि तिच्या जागीच मृत्यू झाला. आता या प्रकरणात पातूर पोलीस ठाण्यात संगीताचे वडील रामचंद्र देवा राठोड यांच्या तक्रारीवरून खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मारेकरी पतीला अटक करण्यात आली आहे.
याधीही आरोपी गोपीचंदवर झाला होता गुन्हा दाखल :
आरोपी गोपीचंद चव्हाणवर या अगोदर सासरे रामचंद्र राठोड यांना मारहाण केल्याने आणि शेताशेजारी असणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी त्याच्यावर कलम 324 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. गोपीचंद चव्हाण याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असूनही, मृत संगिताने पोलिसांत तक्रारी दाखल करून सुद्धा कारवाई झाली नाही. अखेर संगिताला आपला जीव गमावावा लागला. संगिताच्या तक्रारीची गंभीर दखल वेळीच घेतली गेली असती तर आज संगितावर कदाचित ही वेळ आली नसती. संगिताच्या हत्येनंतर दोन मुलांनी आईचं छत्र गमावलं आहे.
ही बातमी देखील वाचा-