Shivsena Communist: मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी चित्र दिसून आले. जवळपास 52 वर्षांचे कट्टर राजकीय वैरी असणाऱ्या शिवसेनेला कम्युनिस्ट पक्षाने थेट पाठिंबा दिला. अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीसाठी (Andheri Bypoll 2022) हा पाठिंबा असला तरी भविष्यातील नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना (Shivsena) आणि प्रजा समाजवाद्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. त्यानंतर प्रजा समाजवादी पक्ष शिवसेनेत विलीन झाला होता. 


बुधवारी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी 'मातोश्री'वर  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात विविध चर्चा सुरू झाल्यात. कम्युनिस्ट पक्षाने घेतलेल्या निर्णयाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य प्रकाश रेड्डी यांनी माहिती दिली.  प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की, सध्या मु्ख्य शत्रू भाजप असून फॅसिस्ट शक्तिंचा पाडाव करण्याची आवश्यकता आहे. भाजप सरकारकडून देशात कॉर्पोरेट हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील तपास यंत्रणा, स्वायत्ता संस्था ताब्यात घेतल्या जाऊन त्याचा दुरुपयोग सुरू असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे प्रकाश रेड्डी यांनी सांगितले. 


कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी पुढे सांगितले की, भाजपकडून देशातील लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवण्याचे काम सुरू आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी प्रादेशिक पक्षांवरही हल्ला सुरू केला आहे. प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडून सुरू असलेले हल्ले ही देशासाठी धोकादायक बाब असल्याचे ही त्यांनी सांगितले. भाजपविरोधात विरोधकांनी एका समान कार्यक्रमावर, संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. भाजपचा पाडाव करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. 


उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत 


उद्धव ठाकरे यांनी मागील काही वर्षात घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया रेड्डी यांनी व्यक्त केली. धर्मांध, द्वेषाच्या राजकारणाऐवजी सर्वसमावेशक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांची भूमिका घेऊन पुढे जात असतील. तर, यात चुकीचे काय असा प्रश्नही त्यांनी विचारला. 


कम्युनिस्ट संपत नसतात 


शिवसेनेने सत्तरच्या दशकात परळमधील दळवी इमारतीमधील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्यानंतर 5 जून 1970 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतरही कम्युनिस्ट पक्षात आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरूच राहिला. शिवसेनेने कम्युनिस्टांचा राजकीय प्रभाव संपवल्याचे म्हटले जाते. याबाबत प्रकाश रेड्डींना विचारले असता, त्यांनी म्हटले की, कम्युनिस्ट पक्षाने आपली भूमिका न सोडता शिवसेनेच्या हल्ल्याचा प्रतिकार केला. कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर किंवा त्यामुळे कम्युनिस्ट संपले असे म्हणता येणार नाही. तसे असते तर वर्ष 1974 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार रोझा देशपांडे विजयी झाल्या नसत्या. त्याशिवाय, गिरणगाव, वरळी भागात कम्युनिस्ट पक्षाचे तीन नगरसेवक विजयी होत असे असेही रेड्डी यांनी सांगितले. कम्युनिस्टांचा राजकीय प्रभाव कमी झाला तरी कम्युनिस्ट संपत नसतात असेही त्यांनी सांगितले.


...तर कोणीच राहणार नाही


 भाजपचा संघटीत प्रतिकार केला नाहीतर कोणी राहणार नाहीत असेही रेड्डी यांनी सांगितले. भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांनी एकत्र आल्यास भाजपचा पाडाव करता येणे शक्य असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.