Ajit Pawar : अजित पवार सत्तेत येताच पुत्र पार्थ आणि जय पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये; पुण्यातील कार्यक्रमात दोन्ही बंधू एकत्र
अजित पवार सत्तेत येताच पुत्र पार्थ आणि जय पवार ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील एका कार्यक्रमात दोघंही सहभागी झाले होते.
Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केलं आणि (Maharashtra Political Crisis) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना अर्थमंत्रीपदाही मिळालं. राज्याच्या सत्तेत येताच अजित पवारांचे दोन्ही मुलं राजकारणात ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांचे दोन्ही मुलं राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. पार्थ पवार यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती मात्र जय पवार राजकारणात सक्रिय नव्हते. आता अजित पवार सत्तेत (Parth pawar and jay pawar) आल्याने वडिलांच्या मागे दोन्ही मुलं राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होऊ पाहत आहेत.
पुण्यात बालेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सतेज करंडक आणि पुणे लीग कबड्डी स्पर्धा 2023 चं उद्घाटन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. वडील युतीच्या सत्तेत सहभागी होताच पार्थ आणि जय ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. या दोघांनी हनुमानाच्या मूर्तीची पूजा करून स्पर्धकांसोबत हस्तांदोलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांसोबत शरद पवारांचांही फोटो पाहायला मिळाला.
2 जुलैला अजित पवारांनी बंड केलं आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्तेत सामील झाले. राज्यात झालेल्या या सत्तानाट्याची जोरदार चर्चा रंगली. पवार कुटुंब भाजपने फोडलं, अशा चर्चा रंगल्या. त्यात अजित पवारांसोबत राज्यातले राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आहेत. त्यामुळे अर्धी राष्ट्रवादी अजित पवारांसोबत आहे. शिवाय गावपातळीवरदेखील अजित पवारांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे गावपातळी किंवा स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील अजित पवारांना समर्थन करत आहे. त्यातच आता दोन्ही मुलंही अजित पवारांच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे.
वडिलांच्या पत्रकार परिषदेत पार्थ पवार आणि जय पवार
अजित पवार भाजपसोबत सामील झाल्यानंतप पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी जय पवार अजित पवारांच्या मागे बसले होते आणि पार्थ पवार बाकी कामगिरी बजावताना दिसले. त्यामुळे येत्या काळात पवार कुटुंबातील हे दोन पुत्र पुन्हा नव्याने राजकारणात सहभागी होणार असल्याचं दिसत आहे.