एक्स्प्लोर
शिवसेनेचे तीन आमदार एकाच गाडीत, ड्रायव्हिंग सीटवर अजित दादा
अजित पवार यांच्यासह शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, राजापूरचे आमदार राजन साळवी, खानापूर -विटाचे आमदार अनिल बाबर यांनी गाडीतून प्रवास केला.

इंदापूर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेच्या तीन आमदारांनी गाडीतून फेरफटका मारल्याने चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्यासह शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, राजापूरचे आमदार राजन साळवी, खानापूर -विटाचे आमदार अनिल बाबर यांनी गाडीतून प्रवास केला. इंदापूर तालुक्यातील कळस या गावातील नेचर डिलाईट डेअरीचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. या डेअरीचे मालक अर्जुन देसाई आणि अजित पवार यांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. या कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. अजित पवार, आमदार सदानंद चव्हाण, आमदार राजन साळवी, खानापूर-विटाचे आमदार अनिल बाबर, करमाळ्याचे नारायण पाटील, काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव सचिन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तासगावच्या आमदार सुमन पाटील, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यावेळी उपस्थित होते. अजित पवार कार्यक्रमाच्या वेळेच्या अगोदरच हजर झाले होते. कार्यक्रमाला वेळ असल्याने डेअरीचा परिसर पाहण्याचं ठरलं. ही डेअरी अत्याधुनिक असल्याने याचा परिसर मोठा आहे. त्यामुळे सर्व नेते गाड्यातून या डेअरीचा परिसर पाहण्यासाठी निघाले. यावेळी अजित पवार यांच्या गाडीत शिवसेनेचे काही आमदार होते. पण काहींना बसण्यासाठी गर्दी होत असल्याने अजित पवार यांनी ड्रायव्हरला उतरवलं आणि स्वतः स्टेअरिंग हातात घेतली. त्यांच्या गाडीत शिवसेनेचे तीन आमदार बसवले. शिवसेनेचे आमदार अजित पवारांच्या गाडीत बसले होते, त्यातील काही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पराभव करुन आमदार झाले आहेत. गाडीतून प्रवास करताना अजित पवार आणि शिवसेना आमदारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट























