मुंबई : अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा कालपासून सुरु होत्या. मात्र मी नाराज नसल्याचं स्वत: अजित पवार यांनी स्पष्ट केलं. काल आमची महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. या बैठकीला मी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे एकत्र जाणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.


अजित पवार राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, अशी चर्चा कालपासून सुरु होती. मात्र या चर्चांना अजित पवारांनी फुल स्टॉप दिला आहे. मी कालही नाराज नव्हतो, आजही नाही आणि उद्याही नाराज नसणार, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेतील, अशी माहिती अजित पवारांनी दिली. तर काँग्रेस आणि शिवसेनेकडून कोण चार आमदार शपथ घेणार हे ठरवण्याचा निर्णय त्यांचा आहे. संध्याकाळी 6.40 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मी तेथे सुप्रिया सुळे यांच्यासोबत जाणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.



महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टीकणार नाही, या विरोधकांच्या आरोपालाही अजित पवारांनी उत्तर दिलं. विरोधकांनी काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करु. या सरकारमध्ये राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे टिकणार यात शंका नाही. तुम्ही म्हणत असाल तर स्टँपपेपरवरही लिहून देतो.  असं अजित पवारांनी सांगितलं.


मंत्रीमंडळातील खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांची काल महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्ष हे काँग्रेसचे असतील तर विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील. उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आले आहे. सुरुवातीपासून अशी चर्चा होती की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळेल. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका नेत्याला उपमुख्यमंत्री मिळेल. परंतु या सर्व चर्चांना अता पूर्णविराम मिळाला आहे.




संबंधित बातम्या