शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत आणि छगन भुजबळ फक्त मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याआधी उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांचं नाव चर्चेत होतं. पण त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन 23 नोव्हेंबरला सत्ता स्थापन केली आणि 26 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सगळ्या घडामोडींमुळे त्यांचं नाव मागे पडलं आणि जयंत पाटील यांचं नाव पुढे आलं. मात्र आता अजित पवार की जयंत पाटील यावरुन राष्ट्रवादीत तिढा आहे. त्यामुळे अद्याप उपमुख्यमंत्र्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
मात्र जयंत पाटील यांचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी समोर आल्यानंतर आपलं नाव मागे पडल्याने अजित पवार नाराज असल्याचं चर्चा आहे. आज सकाळपासूनच ते चर्चगेटमधील त्यांच्या प्रेमकोर्ट या निवासस्थानी नसल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. अजित पवारांच्या गाड्या, पोलिसांचा बंदोबस्त इथे आहे. त्यामुळे अजित पवार घरात नाहीत किंवा त्यांना कोणाला भेटायचं नाही, अशी शक्यता आहे. आता ते सध्या कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुप्रिया सुळे-अजित पवार संपर्कात : सूत्र
दरम्यान सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा फोनवरुन संपर्क झाला आहे. अजित पवार संध्याकाळी साडेपाच वाजता सिल्वर ओकवर जाणार आहेत. तिथून सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर जाणार आहे.
संबंधित बातम्या
अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा
जे झालं ते झालं, आता नवी सुरुवात करायची : अजित पवार
राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी : अजित पवार