मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन परत स्वगृही परतले आहेत. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले आहेत. काही वेळाने ते महाविकास आघाडीच्या बैठकांमध्येदेखील सहभागी होतील. उद्या (28 नोव्हेंबर) महाविकास आघाडीचे नेते मंत्रीमंडळाची शपथ घेणार आहेत. यावेळी अजित पवार यांना मंत्रीपद मिळणार का? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीतही अजित पवारांना याबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, माझ्या मंत्रीपदाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतील.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावळी आमदारांनी अजित पवारांना विचारले की, तुम्ही मंत्री होणार का? त्यावर अजित पवार म्हणाले की, त्याबद्दलचा निर्णय पवारसाहेब घेतील.

यावेळी अजित पवार यांनी सर्वांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार म्हणाले की, जे झालं ते झालं. ते संपलंय आता. आता नवीन सुरुवात करायची आहे. पक्षासाठी जोमाने काम करायचं.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच वाढलेला असताना भाजपने आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचदरम्यान अचानक अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करुन भाजपशी हातमिळवणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सोबत नेले. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने राज्यात सत्तास्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

परंतु, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीनच दिवसात अजित पवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि स्वगृही परतले आहेत. अजित पवारांनी फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे ते सरकार पडलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी राज्यात सत्तास्थापन करणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात अजित पवारांना संधी मिळणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

स्वगृही परतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया पाहा



अजित पवारांना मंत्रीपद मिळणार का? जयंत पाटलांना काय वाटतं?



वाचा : अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा