नागपूर : एक मध्यमवर्गीय माणूस घर घ्यायचं म्हटलं तर जसं आपल्या सोयीचं बायको-मुलांच्या ऑफिस-शाळेसाठी जवळ असं घर शोधतो तशीच काहीशी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्रींवर वेळ आली आहे असं म्हणायला हरकत नाही. माजी मुख्यमंत्री आणि नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता राहण्यासाठी नवं घर शोधण्याची वेळ आली आहे, फडणवीसांच्या पत्नी अमृता या घराच्या शोधात असल्याची माहिती मिळाली आहे. याचं कारण असं की महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाल्याने आता मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा हे माजी मुख्यमंत्र्यांना रिकामं करावं लागणार आहे. मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ संपल्याने त्यांना वर्षा बंगला सोडावा लागतोय पण देवेंद्र फडणवीसांनी वर्षामध्ये राहण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून मागितली होती.
राष्ट्रपती राजवटीची जेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा होत होती तेव्हा फडणवीसांनी मुदतवाढीची मागणी केली होती. आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनाच या निवासस्थानी राहण्याची इच्छा दिसत नाहीए. मुंबईतच घर शोधणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे कारण पत्नी अमृतांचं ऑफिस आणि मुलगी दिविजा हिची शाळा मुंबईतच आहे. अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेच्या कॉर्पोरेट हेड उपाध्यक्षा आहेत, त्यांचं ऑफिस मुंबईतच आहे आणि मुलीची शाळादेखील मुंबईतच असल्याकारणाने मुंबईत राहतं घर शोधणं त्यांच्यासाठी भाग आहे.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते म्हणून भाजप देवेंद्र फडणवीस यांचीच नियुक्ती करणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधीपक्षनेते म्हणून त्यांना घर नक्कीच मिळेल पण त्या घराचा ऑफिस म्हणून फक्त कामांसाठीच वापर केला जाईल. नागपूरकर असल्याने देवेंद्र फडणवीसांचं नागपूरमध्ये धरमपेठेत अगदी वडिल आमदार असल्यापासूनचं हक्काचं घर आहेच, मात्र त्यांच्या घराची डागडुजी सुरु आहे आणि या दुरुस्तीच्या कामाला जवळपास दीड-दोन महिने आणखी लागणार आहेत.
नागपूरमधलं मुख्यमंत्री निवास रामगिरीदेखील ते आता सोडणार आहेत, नागपूरचं विरोधीपक्षनेत्यांचं घर ते तात्पुरतं वापरतील. परिवार नागपुरात नसल्याने ते मुंबईतच स्थायी होतील आणि लवकरच नव्या घरी राहायला जातील. जोवर नवा निवारा मिळत नाही तोवर माजी मुख्यमंत्र्यांचं हे हाऊस हंटिंग सुरुच राहील असं दिसतंय.
देवेंद्र फडणवीस मुलगी दिविजा आणि पत्नी अमृतासोबत