Ahmednagar Kopargaon Crime: रागाच्या भरात माणूस कधी काय करेल सांगता येत नाही. रागात आपल्या रक्ताच्या नात्यांनाही संपवून टाकलं जातं. असंच एक प्रकरण कोपरगाव तालुक्यातील (Kopargaon Murder Crime News) एका गावात समोर आलं आहे. प्रेम प्रकरणाबद्दल घरच्यांना माहिती दिली या रागातून मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी बहिणीला बेड्या ठोकल्या आहेत.


16 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला


अहमदनगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात 30 सप्टेंबर रोजी 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे भासत होते. मात्र तिची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे नंतर समोर आलं. मयत तरुणीच्या 19 वर्षीय मोठ्या बहिणीनेच हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. 


तरुणासोबत पळून जाणार असल्याबद्दल लहान बहिणीने घरच्यांना सांगितलं अन्


मोठ्या बहिणीचे श्रीरामपूर तालुक्यातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ती त्या तरुणासोबत पळून जाणार असल्याबद्दल लहान बहिणीने घरच्यांना सांगितलं. त्यानंतर घरच्यांनी मोठ्या बहिणीला समज दिली होती. तसेच काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती. त्यातूनच प्रेमात आंधळी झालेल्या मोठ्या बहिणीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून आपल्याच लहान बहिणीची हत्या केली. 


हत्येनंतर आरोपी असलेली मोठी बहिण प्रियकरासोबत ठरल्याप्रमाणे पळून गेली


हत्येनंतर आरोपी असलेली मोठी बहिण प्रियकरासोबत ठरल्याप्रमाणे पळून गेली. कोपरगाव पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करत आरोपी बहीण आणि तिचा प्रियकर यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच मयताच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी  बहिणीविरोधात हिच्यावर  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आंधळ्या प्रेमापोटी मोठ्या बहिणीने सख्ख्या लहाण बहिणीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


'जो मनाचा मोठेपणा बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता तो पंतप्रधान मोदींमध्ये नाही'; भर पावसात प्रकाश आंबेडकरांची सभा