Akola Prakash Ambedkar Dhamma Chakra Pravartan Rally: राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा दाखवण्याचं जे मोठेपण बाळासाहेब ठाकरेंमध्ये होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलं आहे. अकोल्यात आज प्रकाश आंबेडकरांनी भर पावसात सभा घेतली. भारतीय बौद्ध महासभेनं घेतलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला ते प्रमुख वक्ते होते. अकोला क्रिकेट क्लबवर झालेल्या मैदानावरच्या या सभेला भरपावसातही लोकांनी गर्दी केली होती. 


आज अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा झाला. भारतीय बौद्ध महासभा घेत असलेल्या या सभेला गेल्या 38 वर्षांपासून प्रकाश आंबेडकर प्रमुख वक्ते असतात. यंदा अकोला क्रिकेट क्लबवर झालेली ही सभा मात्र पावसामुळे पार विस्कळीत झाली. 


भारताची अर्थव्यवस्था दारूड्यासारखी


पावसात झालेल्या या सभेत प्रकाश आंबेडकरांनी जोरदार भाषण केलं. त्यांनी म्हटलं की देवेंद्र फडणवीसांचं डिमोशन झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर ते उद्या अकोल्यात येत आहेत.  प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था दारूड्यासारखी आहे. दारूड्या जसं एक-एक सामान विकतो, तसा देशाचा कारभार आहे. पंतप्रधान मोदींना दारूड्या म्हणणार नाही, मात्र, वागणूक तशीच आहे, असा टोला आंबेडकरांनी लगावला. 


आरेला कारे करण्याची तयारी ठेवा


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरपंचाची निवड सरकारने थेट केली. यापुढे सर्वच ग्रामपंचायत निवडणुका वंचित लढणार आहे. कार्यकर्त्यांनी या निवडणुका ताकदीने लढवायच्या. आरेला कारे करण्याची तयारी ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं. ज्यांनी आमच्यावर 'बी टीम'चा आरोप केलाय. तेच आमच्यासोबत आज बसायच्या गोष्टी करतायेत, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला लगावला.   


अकोल्यात गेल्या 38 वर्षांपासून धम्मचक्र प्रवर्तन दिन  सोहळा


अकोल्यात गेल्या 38 वर्षांपासून धम्मचक्र प्रवर्तन दिन  सोहळा असतो. गेल्या 38 वर्षांपासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सोहळा होतो. पण गेल्या 38 वर्षांपासून या सोहळ्याचे मुख्य आकर्षण आणि मुख्य वक्ते असतात प्रकाश आंबेडकर. शिवसेनेत 'शिवतीर्था'वरच्या दसरा मेळाव्याचं जे स्थान आहे तेच प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय प्रवासात या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं स्थान आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वर्षभरातल्या राजकीय वाटचालीची बीजं आणि मार्ग या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्यातील भाषणावरून ठरवला जात असतो.


इतर महत्वाच्या बातम्या


BLOG: अकोल्यातील प्रकाश आंबेडकर आकर्षण धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा 38 वर्षांचा इतिहास


महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता; प्रकाश आंबेडकरांचा थेट आरोप