मुंबई : ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून धनुष्यबान चिन्हाचा गैरवापर होतोय अशी तक्रार करत पक्षाच्या चिन्हाचा तात्काळ निकाल लावावा अशी मागणी शिंदे गटाकडून (Eknath Shinde) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) केली आहे. 4 ऑक्टोबर रोजी यासंबंधी एक पत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. तसेच धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.
येत्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आम्हाला हे चिन्ह मिळावं अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून या चिन्हाचा गैरवापर करण्यात येत असून त्यासंबंधीची काही कागदपत्रं शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा केले आहेत. शिंदे गटाच्या या तक्रारीनंतर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल.
धनुष्यबाण कुणाचा याचा निर्णय उद्या लागण्याची शक्यता
शिवसेनेतील (Eknath Shinde) झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाने शिवसेना पक्ष आपलाच असल्याचा दावा केला आहे. तसेच पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे देखील आपल्याला मिळावं अशी मागणी करत शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. धनुष्यबाण कुणाचा यावर उद्या म्हणजे शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता काही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी या संबंधी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपली बाजू मांडायला सांगितली आहे. एकीकडे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
दोन्ही गटांचा दावा काय?
धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला असून आपापलं मतही व्यक्त केलं आहे. चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही, अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे. तर शिंदे गटाचा दावा आहे की, विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे.लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असलं तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाण्याची शक्यता आहे.