(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : कांद्याच्या दरात घसरण, नाशिकच्या शेतकऱ्यानं केला कांद्याचा अंत्यविधी
पावसामुळं कांदा सडू लागल्यानं त्याला बाजारात कवडीमोलाचा दर मिळतोय. त्यामुळं नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याचा अंत्यविधी केला आहे.
Agriculture News : राज्यात सध्या अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. यामुळं शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं आडवी झाली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्याला देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका फटका बसला आहे. कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळं कांदा सडू लागल्यानं त्याला बाजारात कवडीमोलाचा दर मिळतोय. त्यामुळं नाशिकच्या सटाणा (Satana) तालुक्यातील डांगसौंदाणे येथील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याचा अंत्यविधी केला आहे. योगेश सोनवणे असं या शेतकऱ्याचे नाव आहे.
Unseasonal rain : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं कांद्याचं मोठं नुकसान
नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजून सडू लागला आहे. बाजारात त्या कांद्याला कोणी बोली लावत नाही. बोली लागली तर कवडीमोल भावाची लागत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा कांदा बाजारात नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हताश झाले आहेत. त्यामुळं नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील योगेश सोनवणे या शेतकऱ्याने शेतातील कांद्याचा अंत्यसंस्कार केला. शेतात साठवून ठेवलेल्या कांद्यावर अंत्यसंस्कार करत कांदा ट्रॅक्टरने पसरवून नष्ट करत आपल्या भावानांना वाट मोकळी करुन दिली.
अडचणीत आलेल्यांना सरकारनं दिलासा द्यावा, शेतकऱ्यांची मागणी
शेतात राब-राब राबून कांदा पिकवायचा अन् निसर्गानं तो हिरावून न्यायचा. यामुळं शेतकरी अडचणीत आला आहे. मायबाप सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, सक्तीची वीजबिल आणि कर्ज वसुली तूर्त थांबवावी. तसेच अवकाळी पावसानं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
कांदा पाण्यात भिजल्याने सडला
अवकाळी पावसात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. अनेक ठिकाणी कांद्याचं पिक भूईसपाट झालं आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे पिकात पाणी साचलंय. त्यामुळं काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडला आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्याखालोखाल, भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष आणि आंबा फळाला फटका बसला आहे. पावसाचा इशारा कायम असल्याने बळीराजासमोरील चिंतेचे ढग कायम आहेत. पंचनामे सध्या सुरु असून प्रत्यक्षात मदत कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: