Dhananjay Munde : चालू खरीप हंगामात राज्यातील कृषी विद्यापीठांनी (Krishi Vidyapeeth) शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोनद्वारे (Drone) फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिले आहेत. शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळं ड्रोनद्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी अशी दैनंदिन कामे होणे आवश्यक असल्याचे मुंडे म्हणाले. तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांनी देशात आदर्श निर्माण करावा असे मतही मुडेंनी व्यक्त केलं. तसेच कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरामुळं युवकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होईल, असे मुंडे म्हणाले. 


महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था (आर.पी.टी.ओ.) अंतर्गत सुरु असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र इतर विद्यापीठातही चालू करण्यासंदर्भात प्रकल्पाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष कराड, तसेच कृषी  विद्यापीठाचे संबंधित विभागाचे संशोधन अधिकारी, प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घ्यावेत, असे निर्देश मुंडे यांनी दिले. 


ड्रोनद्वारे फवारणीसाठी शासनाचा पुढाकार


दरम्यान, सध्या शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळं ड्रोनद्वारे शेतातील पिकांची फवारणी करणं गरजेचं असल्याचे कृषीमंत्री म्हणाले. त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. ही कामे ड्रोनद्वारे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाद्वारे केल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात किती फरक पडेल याचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.


विद्यापीठांनी  शेतकऱ्याला येणाऱ्या उत्पादन खर्चाचा अहवाल शासनाला सादर करावा


विद्यापीठांनी कापूस, सोयाबीन, भात, तूर, ऊस आदी सर्व प्रकारच्या पिकांचा समावेश असलेल्या प्रत्येकी 100 एकर आकाराच्या प्लॉटवर ड्रोनचा वापर करावा. यासाठी शेतकऱ्याला येणाऱ्या उत्पादन खर्चाचा तुलनात्मक अहवाल शासनाला सादर करावा. त्या आधारावर राज्यात सर्वत्र शेतीतील दैनंदिन कामांसाठी ड्रोनचा वापर करण्याचे धोरण शासन निश्चित  करेल, असेही निर्देश या बैठकीत मुंडेंनी दिले आहेत.
तसेच नॅनो युरिया सुद्धा ड्रोनद्वारे फवारणी करुन राज्यातील कृषी विद्यापीठांनी देशात आदर्श निर्माण करावा. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरामुळं युवकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होईल, यासाठीही प्रयत्न केले जावेत, अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Latur News : ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शंखी गोगलगायच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण; मराठवाड्यातील तीन तालुक्यांमध्ये काम सुरु