Hingoli News : आमदार संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात, कृषी विभागातील कर्मचारी करणार विरोधात आंदोलन
Hingoli News : आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आज हिंगोलीच्या (Hingoli) कृषी विभागातील कर्मचारी आंदोलन करणार आहेत.
Hingoli News : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या विरोधात कृषी विभाग आक्रमक झाला आहे. त्यांच्या विरोधात आज हिंगोलीच्या (Hingoli) कृषी विभागातील कर्मचारी आंदोलन करणार आहेत. कारण काल (14 ऑक्टोबर) संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षकांना शिवराळ भाषेचा वापर करत धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. याविरोधात कृषी विभागातील कर्मचारी आक्रमक झालं आहेत. त्यामुळं आमदार बांगर हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
विमा कंपनीच्या कार्यालयाची केली होती तोडफोड
आमदार संतोष बांगर यांच्या शिवराळ भाषेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज हिंगोलीत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यांच्या विरोधात आज हिंगोलीच्या कृषी विभागातील कर्मचारी एकत्र येणार आहेत. दरम्यान, पिक विम्याच्या मुद्यावरुन आमदार बांगर यांनी कृषी अधीक्षकांना शिवीगाळ केली होती. पिक विमा कंपनीच्या वतीनं बनवाबनवी करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती बांगर यांना मिळतात, त्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात धडक दिली होती. त्यावेळी तिथे तोडफोड देखील केली होती. यावरुन आमदार बांगर यांनी कृषी अधिक्षक यांनाच शिवीगाळ करत धमकावले होते. विमा कंपनीवर तुमची वचक का नाही? तुम्ही का लक्ष ठेवत नाहीत? असे बोलत कृषी अधीक्षकांना शिवीगाळ केली आहे.
शेतकऱ्यांसमोर समस्त कृषी विभागाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
दरम्यान, याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटवना हिंगोली यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. यामध्ये हिंगोली जिल्हा कृषी अधिक्षक यांना लोकप्रतिनीधी यांनी अपशब्द वापरले आहेत. संतोष बांगर यांनी पिक विमा कार्यालयात बोलावून अधिकाऱ्यांच्या वयाच्या ज्येष्ठतेचा आणि पदाचा विचार न करता कानाखाली आवाज काढील असे शब्द वापरले आहेत. शेतकऱ्यांसमोर समस्त कृषी विभागाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करुन नाहक मानसिक त्रास दिला आहे. या असंवैधानिक वागणुकीमुळं जिल्ह्यातील कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये दहशत व भितीचं वातावरण तयार झालं असल्याचे निवेदनात म्हटलं आहे.
पूर्वी वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी कायमच भक्कमपणे उभा राहिला आहे. या पुढेही राहिल. मात्र, नाहक कृषी विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. त्यांना अपमानित करुन खच्चीकरण केलं जात आहे. त्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत, आश्रम शाळेचा 27 कोटींचा निधी मतदार संघात वळवण्याचा प्रयत्न